Maharashtra Government : राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारच्या कार्यकाळ आता जोमाने सुरू झाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे गाजत आहेत. पण यंदा दरवर्षीप्रमाणे पोलिसांचे डोकेदुखी काही कमी आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा विधान भवनावर धडकणाऱ्या मोर्चांची संख्या कमी आहे.
सरकार सत्तारूढ झाल्यानंतर नागपूरमध्ये हे पहिले हिवाळी अधिवेशन होत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असला तरी अद्यापही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे नव्या सरकारचे नवे अधिवेशन पाच दिवसांमध्ये सरकार घेत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अद्यापही कोणतेही खाते मिळालेले नाही. त्यामुळे विधान मंडळावर मोर्चा घेऊन येणाऱ्या नागरिकांनाही कोणाला भेटायचे? असा प्रश्न पडत आहे.
मोजकी संख्या
यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कधी नव्हे ते सर्वात कमी मोर्चे आहेत. आतापर्यंत केवळ तीन मोर्चे निदान भावनावर धडकले आहे. त्यापैकी किंवा दिव्यांग बांधवांचा मोर्चा थोडासा आक्रमक होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मोर्च्याची संख्या मर्यादितच आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (18 डिसेंबर) दोन मोर्चे विधान भवनावर धडकले. या मोर्चाची संख्याही कमी होती. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात कधी नव्हे तो सीताबर्डी, गणेश टेकडी, संविधान चौक, रेल्वे स्टेशन हा मार्ग मोकळा होता.
खबरदारीचा उपाय म्हणून झिरो माइल चौकातील मोर्चा पॉइंटवर पोलिसांनी नेहमीप्रमाणे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा पोलीस बऱ्यापैकी ‘रिलॅक्स’ होते. झिरो माइल चौकातून बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत सुरू होतील. रिझर्व बँक चौक ते आकाशवाणी पर्यंतचा मार्ग मात्र नेहमीप्रमाणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या अधिवेशन काळामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागपूरमधील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. आता लवकरच विधान भवनाच्या विस्तारित इमारतीचे काम सुरू होणार आहे. या कामादरम्यान वाहतूक व्यवस्था खोळंबणार नाही याची काळजी सुद्धा सरकारकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे जसजसे विधान भवनाचे काम पुढे सरकेल तसतसे वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा कमी होत जाईल.
राज्यभरातून बंदोबस्त
हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी सुमारे साडेसात ते आठ हजारावर पोलीस मनुष्यबळ नागपूर शहरात तैनात केले जाते. यंदाही तेवढेच मनुष्यबळ तैनात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार नागपूर येथील राजभावनात झाला. त्यानंतर सर्व मंत्र्यांना नियमानुसार पोलीस संरक्षण पुरवण्यात आले. सर्व मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. लवकरच खातेवाटप देखील होणार आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनामध्ये विधानभवनावर धडकणाऱ्या मोर्चांची संख्या देखील अधिक असेल असे सांगितले जात आहे.