शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २३ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा तुपकरांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी कलम १६८ अंतर्गत तुपकरांना नोटीस बजावली आहे. पण तुपकरांनी मागे हटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांना कळवली आहे.
‘आजवर अशा हजारो नोटीस आलेल्या आहेत. नोटीस आणि पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहे. त्यामुळे कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ‘वर्षा’ बंगल्यावर जाणारच,’ अशी अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. नागपूर येथे २० ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला होता. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे. मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मुंबईत घेऊन जाणार. त्यानंतर शेतकरी आत्महत्या कसा करतो, याचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखवणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर यंत्रणा सतर्क झाली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी देखील रविकांत तुपकर यांनी मुंबईत धडक देऊन आंदोलन केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तुपकरांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता आपण आंदोलन करू नये असे पोलिसांनी तुपकरांना सांगितले आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी ही नोटीस बजावली आहे. त्याचवेळी आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
नोटिसांनी कपाट भरले आहे
पोलिसांनी दिलेल्या अशा नोटीसला आणि कारवाईला मी घाबरत नाही. अशा नोटिसांनी घरातील कपाट भरले आहे. पोलीस कारवाईचा धाक दाखवून सत्ताधारी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जीव गेला तरी आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करतच राहणार, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी जाहीर केली आहे.