महाराष्ट्र

MNS Vs NCP : जय मालोकारच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादीवर आरोप

Akola Police : अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविला

Amol Mitkari Attack : अकोल्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू झाला. या घटनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. अकोल्यात मंगळवारी (ता. 30) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला. शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार घडला होता. यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर सिव्हिल लाइन्स पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. .

आरोपीच्या यादीत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचाही समावेश होता. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जय यांच्या मृत्युला शासकीय विश्रामगृहावर अमोल मिटकरींच्या कार्यकर्त्यांकडून झालेली झटापट कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप जयच्या नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष

जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष होते. सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये ते तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होते. अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास असलेले जय मालोकार गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. मनसैनिकाच्या मृत्युंनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपण लवकरच जय मालोकार याच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी आता या मृत मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावे असे आवाहन देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींच्या घरासमोर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला शहरातल्या तोष्णीवाल ले-आउटमधील मिटकरींच्या निवासस्थानी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या राड्यानंतर रात्री उशिरापर्यंत हा वाद कायम होता. मिटकरी अद्यापही राज ठाकरे यांच्यावर टीका करीतच आहेत. अशात सहकारी जय मालोकार याच्या मृत्युमुळे मनसे आणखी संतापली आहे. आता मिटकरी यांना सोडणार नाही, अशा आक्रमक भूमिकेत कार्यकर्ते आले आहेत. त्यामुळे पोलिस कामाला लागले आहेत.

यापूर्वीही मिटकरी यांना फेब्रुवारी 2024 मध्ये पोलिस संरक्षण देण्यात आले होते. धमकीच्या कॉल्सनंतर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिवारातील कुणाच्याही केसालाही धक्का लागल्यास त्याला पोलिस जबाबदार राहतील, असे मिटकरी त्यावेळी म्हणाले होते. यासंदर्भात त्यांनी 23 फेब्रुवारी रोजी खदान पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. नरेश राऊत नामक व्यक्तीने ही धमकी दिल्याचे पुढे आले होते. नरेश पोलीस बॉयज संघटनेचा व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले होते. दहा हजार रुपयांमध्ये सुपारी घेऊन ही धमकी देण्यात आल्याचे मिटकरी यांनी त्यावेळी म्हटले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!