Civil line police Station : एका डॉक्टरविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी रात्री 2 वाजेपर्यत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच चार दिवस हे प्रकरण चौकशीत ठेवले. महिलेवरचं कारवाई करण्याची धमकी पोलिसांकडून दिल्या गेली. असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी चार दिवसांनी गुन्हा दाखल केला.
शहरातल्या जठारपेठ भागातील डॉ. प्रवीण अग्रवाल यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, महिलेला तिच्या 3 वर्षाच्या मुलासह सायंकाळ पासून ते रात्री 2 वाजेपर्यत बसवून ठेवले. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली.
हनुमान जयंतीच्या दिवशीचा हा प्रकार होता. त्यानंतर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र, तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट आपल्यावरचं कारवाईच्या धमक्या पोलिसांकडून मिळाल्या. मुलगा रडत असल्याने पोलिस ठाण्यातून घरी परतावे लागले,असे तक्रारदार महिलेने प्रसार माध्यमांसमोर सांगितले.
महिलेची नेमकी तक्रार काय?
30 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजता तक्रारदार महिला चेहऱ्यावरील आजार दाखवण्यासाठी जठारपेठेतील चाइल्ड अॅड ब्युटी केअर होमिओपॅथिक क्लिनीक मध्ये गेली होती. दरम्यान, अग्रवाल यांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग केला असा आरोप आहे. यानंतर दवाखान्यात गोंधळ उडाला. महिलेचा लहान भाऊ आणि डॉक्टरमध्ये शाब्दिक वादही झाला. अखेर महिलेने स्टेशन गाठले.
मात्र, तक्रारीवर चार दिवस पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. अखेर 4 दिवसांनंतर सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला 354 (A) नुसार डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पोलिसांची प्रतिक्रिया!
सिव्हिल लाईनचे ठाणेदार अजित जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, महिलेच्या तक्रारीनंतर दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महिलेला रात्री 2 वाजेपर्यत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते हे योग्य आहे का? असे विचारले तेव्हा जाधव म्हणाले, महिलेला रात्री 7 वाजेनंतर अटक करता येत नाही. परंतु तक्रारदार महिला कितीही वेळ ठाण्यात थांबू शकतात.
Lok Sabha Election : स्ट्रॉंग रूम परिसरात दारुड्याचा धिंगाणा !
पोलिस हे नागरिकांच्या रक्षणासाठी असतात. त्यांच संरक्षण करणं हे त्यांचे कर्तव्य असते. पण त्याच पोलिसांच्या कानावर नागरिकांचा आवाज पडत नसेल ? अशावेळी फिर्याद कोणाकडे करायची ? असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित होत आहे.
राजकीय हस्तक्षेपाची शक्यता
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची शक्यता व्यक्त होत आहे. कारण तक्रारदार महिलेला पोलिस ठाण्यात रात्री 2 वाजेपर्यंत ताटकळत ठेवणे, चार दिवस गुन्हा दाखल न करणे यामुळे संशय बळावत आहे. सत्य काय ते कळावे अशी मागणी होत आहे.