Motor Vehicle Act : राज्यामध्ये सत्तारूढ होत असलेल्या नव्या सरकारला हेल्मेट सक्तीच्या नवीन आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. महायुतीला बहुमत मिळते न मिळते तोच पोलीस विभागाने नवीन आदेश काढला आहे. त्यानुसार दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी या संदर्भातील कारवाईला देखील सुरुवात करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारला या संदर्भात पोलिसांना जरा दमानं घ्या असा सल्ला देण्याची वेळ येणार आहे.
हेल्मेट सक्ती संदर्भातील आदेश आल्यानंतर सगळ्यात कडक अंमलबजावणी नागपूर शहरात सुरू झाली. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर हेल्मेट संदर्भातील कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी धावपळ करीत तातडीने हेल्मेट खरेदी केले. याउलट पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला प्रचंड विरोध झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना सबुरीचा सल्ला दिला होता. आजही पुण्यामध्ये बऱ्यापैकी दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत.
नागपूरवरच जोर का?
वाहतूक संदर्भातील कोणतेही नियम आल्यानंतर त्याची सगळ्यात पहिली अंमलबजावणी विदर्भात केली जाते. त्यातल्या त्यात नागपूर पोलीस दुसऱ्या दिवसापासूनच कारवाईला सुरुवात करतात. याउलट पुणे, नाशिक, मुंबई येथे मात्र सरकारकडून पोलिसांना कारवाईबाबत संयम बाळगा असं सल्ला दिला जातो. त्यामुळे नागपुरातील दुचाकी चालकांनी सरकारचे काय घोडे मारले आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट सक्ती हा काही नवीन कायदा नाही. मोटर वाहन कायद्यात त्याची आधीपासूनच तरतूद आहे. परंतु अलीकडच्या काही वर्षात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या भरोशावर बहुमत मिळालं असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशाला हेल्मेटची सक्ती केली तर लाडके वाहन चालक नाराज होतील यात काहीच संशय नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काळजीवाहू गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेल्मेट सक्तीबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
नेत्यांकडून उल्लंघन
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाहतूक नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली झाली. मोटर सायकल रॅली काढताना एकाही नेत्यांनी हेल्मेटचा वापर केला नाही. इतकेच नव्हे तर दुचाकीवर तीन ते चार कार्यकर्ते दिसून आले. रॅलीमध्ये सगळ्यात पुढे राहण्यासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेगाने ड्रायव्हिंग देखील केले. मात्र या सगळ्याकडे पोलीस विभागाने डोळेझाक केली. त्यामुळे कायदा व नियम फक्त सामान्यांसाठीच आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित झाला होता. अशा परिस्थितीत हेल्मेट सक्तीला सुरुवात झाल्यास नागरिकांचा रोष सरकारला सहन करावा लागणार आहे.