लोकसभा निवडणुकीत अवघ्या 48 मतांनी विजयी होत खासदार झालेले उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर वनराई (मुंबई) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश पंडीलकर असे वायकर यांच्या मेव्हण्याचे नाव आहे. मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करणे चांगलेच भोवले आहे. मात्र सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे या संदर्भातील तक्रारकर्ते भरत शाह यांचे म्हणणे आहे.
4 जून रोजी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातुन ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केल्यावर फेरमतमोजणीनंतर वायकर जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. याविरोधात ठाकरे गटाने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेतच. मात्र मतमोजणीच्या दिवशी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर मतमोजणी केंद्रावर परवानगीविना मोबाईलचा वापर करत होते. या प्रकरणावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
कुणी केली तक्रार
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर हे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत होते, असा आरोप आहे. मतमोजणी केंद्रातील खोलीत परवानगी नसतानाही मोबाईलचा वापर केल्याची तक्रार वनराई पोलीस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती.
Maratha Reservation : खासदाराच्या पत्रामुळे ओबीसी, कुणबी समाज नाराज
टपाली मतपत्रिकांच्या फेरीच्या जाहीर झालेल्या निकालात अमोल कीर्तिकर यांना 1 हजार 501, तर रवींद्र वायकर यांना 1 हजार 550 मते प्राप्त झाली होती. शेवटच्या फेरीअखेर मतदानयंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार अमोल कीर्तिकर हे एका मताने आघाडीवर होते. नियमाप्रमाणे अखेरच्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये वायकर हे 48 मतांनी आघाडीवर होते. असा आरोपही त्यांनी केला आहे.
गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न
शाहांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, स्थानिक तहसीलदारांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. भरत शाहांना साक्षीदार बनवलं, याशिवाय एफआयआरची कॉपी देण्यासही नकार दिला, असा आरोप भरत शाह यांनी केला आहे. हे प्रकरण दाबण्याचा आणि गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
नाट्यमय घडामोडी
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अखेरच्या फेरीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या व त्यात शिवसेनेचे रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. त्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या मागण्या व त्यावरील कारवाई ही पूर्णपणे व्हिडीओ रेकॉर्डिंगसह आणि नियमांचे तंतोतंत पालन करूनच करण्यात आली आहे, असे या मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.