महाराष्ट्र

Online Scam : आमदाराच्या आईची फसवणूक करणारा जाळ्यात

Police Action : नागपूर येथून तरुणाला केली अटक

Cyber Crime : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांची आई डिलनबाई रहांगडाले यांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नागपूर येथील युवकाला अटक केली आहे. डिलनबाई यांचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या तिरोडा शाखेत बचत खाते आहे. या खात्यातून 1 लाख 82 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्झेक्शन करून फसवणूक करणाऱ्या नागपूर येथील आरोपीला तिरोडा पोलिसांनी 18 जुलै रोजी अटक केली आहे. रोशन श्यामसुंदर शहारे (वय 25, रा. गिट्टीखदान, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या आईच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने 1 लाख 82 हजार 48 रुपये एका अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यात वळते केले होते. ही घटना तिरोडा तालुक्यातील खमारी येथे घडली. डिलनबाई रहांगडाले यांच्या खात्यावर अज्ञात व्यक्तीने 7441017570 हा मोबाइल क्रमांक सक्रिय केला. त्यानंतजर यूपीआयच्या (UPI) आधारे खात्यातून 3 ते 16 जुलैदरम्यान 1 लाख 82 हजार 48 रुपये आपल्या खात्यात वळते केले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रहांगडाले यांनी तिरोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रहांगडाले यांच्यामार्फत विवेक ढोरे यांनी तिरोडा पोलिसांत फसवणूक प्रकरणाची तक्रार दाखल केली.

वेगाने तपास 

प्रकरणाचा तपास ठाणेदार अमित वानखेडे यांनी केला. डिलनबाई रहांगडाले (रा. खमारी) यांच्या खात्यातून आरोपी रोशन शहारे याने आपली ओळख लपवून यूपीआय खाते सुरू केल्याचे तपासात सिद्ध झाले. रहांगडाले यांच्या खात्यातून 1 लाख 82 हजार 48 रुपये वेगवेगळ्या वेळी ट्रान्झेक्शन करून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपी रोशन शहारे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर तपास करून रोशनचा माग काढण्यात आला. त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार पोलिसांनी आवाहन केल्यानंतरही सायबर चोरट्यांच्या जाळ्यात ज्येष्ठ नागरीक अडकत आहेत. अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक खाते तयार करूनही लोकांकडून पैसे मागण्यात येत आहेत. सायबर चोरांचा छडा लावतानाही पोलिसांना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्याचे आव्हान भविष्यात निर्माण होणार आहे, यात दुमतच नाही. यावर कायमस्वरुपी उपाय शोधण्यात सरकारला अद्यापही यश आलेले नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!