वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईला आज पोलिसांनी ‘फिल्मी स्टाईल’ अटक केली. गेल्या काही दिवसांपासून ती फरार होती. जमीन हडपण्याच्या प्रकारात शेतकऱ्यावर पिस्तुल रोखल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती. गुरुवारी (दि.१८) सकाळी तिला महाड (जि. रायगड) येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.
गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यातच तिची आई मनोरमा खेडकर हिने पिस्तुल रोखून शेतकऱ्याला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्या फरार झाल्या. गुन्हा दाखल करून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पिस्तुल हातात आणि धाक..
व्हिडीओमध्ये त्या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्याला दमदाटी करत असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने खेडकर दाम्प्त्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर व दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यापासून मनोरमा खेडकर बेपत्ता होत्या.
जमिनीचा वाद
जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही जमीन मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातली असल्याचं सांगितलं जात आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. त्याला गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यातूनच हा वाद उद्भवला. आणि या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दादागिरीची हद्दच
मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं मनोरमा खेडकर शेतकऱ्यांना दरडावून सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांवर ओरडत असताना तिने बंदूक रोखून धरली. त्यानंतर व्हिडिओचा छडा लावण्यासाठी पोलिसांची धडपड सुरूच झाली. अशातच आज हॉटेलमधून तिला ताब्यात घेण्यात आले.
बेहिशेबी मालमत्ता
पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूजा खेडकरच्या वडिलांनी जमा केलेल्या बेहिशेबी संपत्तीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. दिलीप खेडकर यांनी अवैध मार्गाने कोट्यवधी रुपये उकळल्याचा एसीबीला संशय आहे.