Sexual Assault : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे कठोर कायदा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. ते जळगाव खानदेश येथे बोलत होते. कोलकाता आणि बदलापुरातील घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या विविध भागात या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलनही करण्यात येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. महिला अत्याचाराशी संबंधित कायदा आणखी कडक करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
महिलांवर अत्याचार करणारा कायद्यातील त्रुटीमुळे वाचणार नाही, याची काळजी सरकार घेणार असल्याचे मोदी म्हणाले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरण यासाठी सरकार वचनबद्ध आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. हे फक्त ट्रेलर आहे. महिलांसाठी असलेल्या योजना वाढविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करण्यावर भर राहणार आहे. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देण्यात येत आहे. यातून नवीन विचार पुढे येईल, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपूर्ण टीम ही महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील आहे. 2014 पर्यंत देशात 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज सखी मंडळांना मिळाले होते. आताच्या सरकारच्या काळात हे कर्ज नऊ लाख कोटी रुपये झाले आहे. सरकार जी मदत देते त्यांत 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती दिदी बनविण्यात येणार आहे. देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार आहे. देशात महिलांचा विकास सुरू आहे.
दानवे ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यासाठी जात असताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीने ‘जवाब दो..’ आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले. पोलिसांपी ताब्यात घेतल्यावर दानवे म्हणाले की, आमच्या अटकेसाठी एवढा पोलिस बंदोबस्त का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी आहे. नाशिकमध्ये झालेल्या अत्याचाराच्या तीन घटना, बदलापुरातील शोषण, कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधील सामूहिक अत्याचार, बाळापुरातील सहा मुलींचा विनयभंग या घटनांचा निषेध यावेळी करण्यात आला. पंतप्रधानांचा दौरा असल्याने पोलिसांनी यावेळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे नियमानुसार दानवे व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.