अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिरला यांची निवड झाली आहे. बिरला यांची संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून आवाजी मतदानाने निवड करण्यात आली. भाजपच्या ओम बिरला यांच्या विरोधात काँग्रेसने कोडीकुन्नील सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे केले होते. बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत हस्तांदोलन केले. लोकसभा अध्यक्षपदासाठी अशी निवडणूक इतिहासात फक्त तीन वेळाच जी 1952, 1967 आणि 1976 मध्ये झाली आहे.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
“आदरणीय सभापती, तुम्ही दुसऱ्यांदा या खुर्चीवर विराजमान आहात हे सभागृहाचे भाग्य आहे. मी तुमचे आणि संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करतो. सभागृहाच्या वतीने मला तुमचे अभिनंदन करायचे आहे. अमृतकाळात दुसऱ्यांदा या पदावर बसणे ही तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुमच्या अनुभवाने आम्हाला आशा आहे की, तुम्ही आम्हाला पुढील 5 वर्षांसाठी मार्गदर्शन कराल, असे मोदींनी लोकसभेत बिर्ला यांना संबोधित करताना सांगितले. बिरला यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेले निर्णय हा संसदीय इतिहासातील ‘सुवर्णकाल’ मानला जाईल, असेही मोदींनी ठामपणे सांगितले.
खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ते शिकण्यासारखे आहे. तुमची शैली आमच्या युवा खासदारांना प्रेरणा देईल. तुमचे गोड हास्य संपूर्ण सभागृहाला आनंदी ठेवते,” असेही मोदी म्हणाले.
काय म्हणाले गांधी
“हे सभागृह भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही त्या आवाजाचे अंतिम पंच आहात. सरकारकडे राजकीय शक्ती आहे, परंतु विरोधी पक्ष देखील भारतातील लोकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि यावेळी, विरोधक गेल्या वेळेच्या तुलनेत भारतीय जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करतात,” असे विरोधी पक्षनेते म्हणाले. विरोधी पक्षांना कनिष्ठ सभागृहाच्या कामकाजात सभापतींना मदत करायची आहे, असेही गांधी म्हणाले.
विरोधी पक्ष तुमच्या कामात मदत करू इच्छितात. सभागृहाचे कामकाज वारंवार आणि चांगले व्हावे, अशी आमची इच्छा आहे. विश्वासावर आधारित सहकार्य व्हायला हवे. विरोधी पक्षाचा आवाज या सभागृहात मांडू दिला गेला पाहिजे. आम्हाला विश्वास आहे की, विरोधकांना बोलू देऊन, भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची मुभा देऊन तुम्ही भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचे तुमचे कर्तव्य पार पाडाल. असेही राहुल गांधी म्हणाले.