Buldhana News : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती प्राप्त बुलढाणा जिल्ह्यातील घट मांडणीत राजा स्थिर की त्याला धोका हा महत्वाचा भाग राहतो. त्यामुळे चारसौ पार की राहुल सरकार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
अक्षय्य तृतीयेला घट मांडणीची परंपरा आजही जपली जात आहे. खरीप व रब्बी हंगामातील पीक परिस्थिती,पाऊस, सामाजिक,आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी भेंडवळची घटमांडणी आहे. 10 मे रोजी अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर मांडणी केली जाणार आहे. तर भाकीत 11 मे ला पहाटे वर्तविण्यात येतील.
घटमांडणीत असलेल्या पानविडा व सुपारी या वरून देशाचा राजा म्हणजेच नरेंद्र मोदी हे पुढे कायम राहणार की बदल होणार याबाबत भाकीत करण्यात येईल. लोकसभेच्या निवडणूक होत आहे. 4 जून रोजी निकाल येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तविण्यात येणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे सुमारे 350 वर्षांपूर्वीपासून चंद्रभान महाराज वाघ यांनी अक्षय्य तृतियेच्या घट मांडणीला सुरुवात केली. आता ही परंपरा त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ जोपासत आहेत. भेंडवळच्या घटमांडणीत अक्षय्य तृतियेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चालू वर्षातील पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचे भाकीत वर्तविण्यात येते. इंडिया आघाडी व एनडीएमध्ये देशाच्या सत्तेसाठी धमासान सुरू आहे.
राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष ‘भेंडवळ घटमांडणी’ कडे राहते. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करतात.
मागील वर्षीचे भाकित
पावसाबाबत- जून महिन्यात कमी पाऊस त्यामुळे पेरणी उशिरा, जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस, ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस व अतिवृष्टी, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पण अवकाळी पाऊस भरपूर व पिकांचे नुकसान होईल असा अंदाज होता.
भाकिताला अंनिसचा विरोध
भेंडवळची घटमांडणीची राज्यभरात चर्चा असली तरी दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याला विरोध होत आला आहे. भेंडवळची घटमांडणी म्हणजे फक्त ठोकताळे असतात. भेंडवळच्या घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी या घटमांडणीवर कुठलाही विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शेतकऱ्यांना केले आहे. मागील कित्येक वर्षापासून घट मांडणीची भाकितं चुकीची ठरत असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केला जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनिसची मंडळी आज पर्यंत भेंडवळ घटमांडणी बंद करण्यासाठी गावात पोहोचण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही हे विशेष.