BJP Indication : अकोला येथील जाहीर सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना न बोलता संकेत दिला आहे. भाषण आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारांना एका रांगेत उभे राहण्यास सांगितले. मी तुमच्या जवळ येत आहे असे सांगत नरेंद्र मोदी यांनी पोडियम वरून जनसमुदायाचा निरोप घेतला. त्यावेळी सगळे उमेदवार एका रांगेत उभे होते. अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल आणि खामगावचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांनी नरेंद्र मोदी यांना उभे राहण्यासाठी जागा करून दिली. पण पंतप्रधानांनी जे केलं त्याची चर्चा अकोल्यात सुरू झाली आहे.
विजय अग्रवाल आणि आकाश फुंडकर यांच्यामध्ये उभे राहण्यासाठी मोठी जागा असतानाही मोदी यांनी विजय अग्रवाल यांना टाळले. नरेंद्र मोदी यांनी आमदार आकाश फुंडकर यांना आपल्या डाव्या हातावर घेतले. त्यांना ओढून विजय अग्रवाल आणि आपल्या मध्ये उभे केले. त्यानंतर त्यांनी आकाश फुंडकर आणि बाळापूरचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांचा हात हातात घेऊन जनतेला अभिवादन केले. संपूर्ण सभेदरम्यान आणि सभेनंतरही विजय अग्रवाल हे नरेंद्र मोदी यांच्या आसपासच होते. शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिल्यानंतरही विजय अग्रवाल हे मोदींच्या पाया पडले. पण मोदी यांनी आपले लक्ष नसल्याचे दाखवले.
अग्रवाल यांच्याबाबत माहिती
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी माहिती घेऊन ठेवली आहे. विजय अग्रवाल यांना अकोल्यातून टोकाचा विरोध आहे. त्यांच्या पाठीशी कोणीच नाही, हे भाजपमधील सर्वच नेत्यांना ठाऊक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही क्षणी अग्रवाल यांची साथ सोडू शकते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय अग्रवाल यांच्यापासून ठेवलेले अंतर बरेच काही सांगून गेल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर, किशोर मांगटे पाटील अशा अनेकांसोबत मोदींनी भर व्यासपीठावर हसत खेळत भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. महायुती मधील अनेक नेत्यांना मोदी स्वतः जाऊन भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्याशी देखील मोदी यांनी चर्चा केली. पण या सर्वांत त्यांनी विजय अग्रवाल यांच्याकडे जे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात चर्चेला पेव फुटले आहे.
न बोलता कार्यक्रम
भारतीय जनता पार्टीने विजय अग्रवाल यांच्या पाठिंबा काढावा. आपला पाठिंबा हरीश अलीमचंदानी यांना द्यावा, अशी मागणी सर्वचस्तरातून होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौरांसह अनेक नगरसेवकांनी विजय अग्रवाल यांच्यापासून फारकत घेतली आहे. हा प्रचंड विरोध सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी विजय अग्रवाल यांचा हात हातात घेऊन उंचावला असता तर सर्वच विरोधकांची तोंड बंद झाली असती. पण मोदींनीही एकही शब्द न उच्चारता कृतीतून बरेच काही दाखवून दिल्याचे भाजपचे नेते बोलत आहेत.
भाजपने आता विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जाहीर सभेत विजय अग्रवाल यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारला पाठिंबा जाहीर करणे चुकीचे दिसलं असतं. त्यामुळे मोदी यांनी असं करणं टाळलं. संपूर्ण देश चालवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याजवळ प्रत्येक मतदारसंघाची खडानखडा माहिती आहे. याशिवाय त्याचा मतदारसंघात जाहीर सभा घेण्यापूर्वी काय परिस्थिती आहे याचे ‘ब्रीफिंग’ भाजपच्या टीम कडून नरेंद्र मोदी यांना केले जाते. मोदी यांच्या सभेपूर्वी त्यांच्या टीम मधील खास लोक प्रत्येक मतदारसंघाचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ घेत असतात, त्यानुसार काय बोलायचे आणि कोणाला ‘प्रमोट’ करायचे हे मोदी ठरवतात. अकोल्याच्या जाहीर सभेमध्ये मोदींनी विजय अग्रवाल यांना बाजूला करत खामगावचे आमदार आकाश फुंडकर आणि बाळापूरचे उमेदवार बळीराम सिरस्कार यांचा हातात हात घेणे, हे दोन्ही नेत्यांसाठी शुभ संकेत मानले जात आहेत. मोदींच्या सभेनंतर मात्र अकोला पश्चिममध्ये भाजपला सुटलेला घाम आता आणखी तीव्र झाला आहे.