Lok Sabha Election : आरक्षणा बाबत राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या खोट्या आरोपांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. मोदी आरक्षण हटवणारे नाहीत तर देणारे आहेत असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. मागील 10 वर्षात मोदी आणि अमित शहांनी अनेकदा स्पष्ट केले की, अनुसुचित जाती,जमाती,ओबीसी समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही. परंतु त्यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणा मध्ये मोदी आरक्षण हिरावून घेतील असा खोटा आरोप केला. समाजाची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधीच्या या खोटारडेपणाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो. असे रामदास आठवले म्हणाले.
ED Raid : मंत्र्यांच्या पीएकडील नोकरच्या घरातून निघाल्या नोटाच नोटा
हैदराबाद येथे आयोजित रिपाइंच्या बैठकीत ते बोलत होते. रिपाइंचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष रविकुमार पसुला हे वरंगल या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडणुक लढत आहेत. तेलंगणात 17 जागा असून एका जागेवर रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढत आहे.अन्य 16 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षाच्या सत्ताकाळात कधीही आरक्षण विरोधी वक्तव्य केलेले नाही.त्यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला आहे.10 वर्षात चांगले काम करुन मोदींनी जनतेचा विश्वास जिंकला आहे. काँग्रेस आणि विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी हे मोदींवर धादांत खोटे आरोप करित आहेत. 2019 च्या निवडणुकीत बेछुट आरोपाबाबत राहुल गांधींना माफी मागावी लागली होती. तरीही राहुल गांधीचा खोटारडेपणा तसुभर कमी झाला नाही. आता आरक्षणाच्या मुद्यावरून ते मोदींवर खोटे आरोप करीत आहेत. याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी. यासाठी निवडणूक आयोगाला ईमेल पाठवून राहुल गांधींची तक्रार करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.