Vanchit Bahujan Aghadi : कोविड काळात सर्वाधिक भ्रष्टाचार भाजपने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयावर त्यांनी निशाणा साधला. कल्याण मध्ये आयोजित प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. 20 मे राज्यात शेवटचा टप्पा पार पडत आहे. सर्वच पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे ठिकठिकाणी सभा घेऊन भाजपसह विरोधकांचा समाचार घेत आहेत.कल्याण लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार मोहद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर यांच्या प्रचार सभेत बोलताना आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
आंबेडकर म्हणाले, या निवडणुकीतील खाजगी सर्वेनुसार भाजप आता 400 वरून 300 तसेच 300 वरून 200 असे खाली येत आहे. त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हे आता घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचा टोला आंबेडकर यांनी लगावला. तर भाजपाने घोषणा केल्या त्या अंमलात आणल्या नाही. मात्र,भ्रष्टाचाराला भाजपाने आश्रय देऊन त्यांचे पाप धुवून काढले. मोदींकडे असं वॉशिंग पावडर आहे जे भ्रष्टाचाराला धुवून काढते.
सध्याचे राजकारण फसव्यांचे
सध्याचे राजकारण फसव्यांचे आहे. कोविड काळात सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपाने केला असा आरोपही आंबेडकर यांनी केला. रेमेडिसिव्हर इंजेक्शनची जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली नसताना देखील भाजपाने जनतेला इंजेक्शन दिली. तर भाजपा ने 17 लाख कुटुंबाना ईडीची भीती दाखवून घाबवरले. त्यामुळे 17 लाख कुटूंब देश सोडून गेले असा दावाही आंबेडकर यांनी यावेळी केला.
पंतप्रधान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय!
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालय वसुली कार्यालय झालं आहे. गल्लीतला दादा जसा वसुली करतो चार-पाच माणसे कामाला लावून नरेंद्र मोदी वसुली करतात. नरेंद्र मोदी गल्लीतला वसुली दादा करोडोने वसुली करतो, असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. अजून 50 लाख कुटुंबानी देश सोडावा यासाठी पुन्हा मोदींना सत्ता पाहिजे का? असा सवाल विचारत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा 100 रुपयांपैकी 26 रुपये कर्ज होते आता त्यांच्यामुळे 100 रुपयांपैकी 84 रुपये कर्ज झालं आहे. मोदींचा स्वतःचा फंडा एखाद्या दारुड्या सारखा आहे. देशाची 70% रेल्वे खाजगी झाली आहे फक्त 30% सरकारी राहिली आहे हे सर्व मोदींमुळे झालं आहे.
आपल्याला देशाचा कणा मजबूत करायचा आहे. त्यासाठी भाजपाला पाडा असे आवाहन आंबेडकर यांनी मतदारांना केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटावरही टीका केली. उबाठा शिवसेनेचा उमेदवार खरा लढणारा आहे की नुरा कुस्ती सारखा आहे. काँग्रेसला उबाठा शिवसेनेने फसवलं आहे. त्यामुळे काँग्रेस कुठेही प्रचार करताना दिसत नाही असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी आंबेडकर यांनी मुस्लिम बांधवाना मतदान करण्यासाठी आवाहन केले.