10 वर्षांपूर्वी आमीर खान या अभिनेत्याचा ‘पी के.’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्यामध्ये देव-धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक कशी केली जाते, यावर प्रकाश टाकण्यात आला होता. हा चित्रपट चांगलाच गाजला. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथेही असाच एक ‘पी.के’, समोर आला आहे. हा ‘पी.के’ म्हणजे पुसद येथील पी. के. कन्स्ट्रक्शन कंपनी. या कंपनीचे संचालक पी. के. जाधव यांनीही अनोखा कारनामा करत सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच फसवणूक केली आहे. जाधव यांचा कारनामा बघितला की ‘पी के’ चित्रपटाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाअंतर्गत होणारी कामे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक पी.के. जाधव यांनी आपल्या कारनाम्यांनी विभाग हादरवून सोडला आहे. 4 कोटी 21 लाख रुपयांचे काम केले असताना ‘पी.के.’ यांनी तब्बल 9 कोटी 61 लाख रुपयांचे ‘वर्क डन’ प्रमाणपत्र विभागाला सादर करण्याचा पराक्रम केला.
अभियंताकडे चौकशीची मागणी
या प्रमाणपत्राच्या आधारावर यवतमाळ सा.बां. विभागाने त्यांना टेंडरसाठी ‘कॉल’ केला. पण तेथे इतर दोन कंत्राटदारांना संशय आला. त्यामुळे त्यांनी यवतमाळचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे त्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार चौकशी करण्यात आली आणि पी.के. जाधव यांनी कशा पद्धतीने ते बनावट प्रमाणपत्र विभागाला सादर केले. याचा किस्सा समोर आला.
नांदेड जिल्ह्यातील भोकर सा.बां. विभागाअंतर्गत करारनामा क्रमांक 222 दि. 7.3.2022 नुसार पी.के. कन्स्ट्रक्शन कंपनीने 6 कोटी 88 लाख रुपयांचे काम घेतले होते. कंपनीला तेथूनच 9 लाख रुपयांचे ‘वर्क डन’ प्रमाणपत्र पाहिजे होते. पण प्रत्यक्षात ‘वर्क डन’ झालं होतं 4 कोटी 21 लाखाचं. पण 9 लाख रुपयांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पी.के. जाधव यांनी बोगस काम करून विभागाची फसवणूक केल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे, असे पुसद येथील माहिती अधिकार कार्यकर्ते पुंडलिक शिंदे यांनी ‘लोकहित’ला सांगितले.
भोकर सा.बां. विभागाने जाधव यांना 9 कोटी 61 लाख रुपयांचे प्रमाणपत्र दिलेच नाही, अशी माहिती आहे. पण तरीही त्यांनी कारस्थान करून 9 कोटी 61 लाख रुपयांचे ‘वर्क डन’ प्रमाणपत्र सादर केले. आता भोकर विभागाने जाधव यांना किती रुपयांचे काम केल्याचे प्रमाणपत्र दिले, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण प्रमाणित माहितीच्या आधारे ९ कोटी ६१ लाख रुपयांचे प्रमाणपत्र पी.के. जाधव यांनी यवतमाळ सा.बां. विभागाला सादर केले आहे.
Molestation Case : डॉक्टर तरुणीचा विनयभंग करणाऱ्या भूलतज्ज्ञावर गुन्हा
भोकर सा.बां. विभागाने दिलेले प्रमाणपत्र पुसद विभागाने पडताळणी करून यवतमाळ अधीक्षक अभियंता कार्यालयात पाठवले. ते खरे समजून यवतमाळ अधीक्षक अभियंत्यांनी त्याला स्वीकृती दिली आणि टेंडर प्रक्रियेसाठी पी.के. जाधव यांना बोलावले. टेंडर उघडल्यावर यवतमाळच्या नावाजलेल्या दोन कंत्राटदारांनी ‘त्या’ प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आणि सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली.
स्वतःच बदलविले प्रमाणपत्र
यवतमाळ अधीक्षक अभियंत्यांनी 27.10.2023 ला ते प्रमाणपत्र पडताळणीसाठी भोकरला विभागाला पाठवलं. भोकर विभागाने 3.11.2023 ला ते सिमिलर पत्र (वर्क डन सर्टीफिकेट) आम्ही दिले नाही, ते चुकीचे आहे, असे सांगितले. त्यामुळे 9 कोटी 61 लाख ही रक्कम पी.के. जाधव यांनी काही तरी कारस्थान करून स्वतःच प्रमाणपत्रावर बदलवली असल्याची दाट शक्यता आहे. प्रत्यक्षात भोकर सा.बां. विभागाने 4 कोटी 21 लाख रुपयांचे प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते.
भोकर सा.बां. विभागाने उपरोक्त बाब स्पष्ट केल्यानंतरही हा घोळ संपला नाही, तर अधिकच क्लिष्ठ झाला. भोकर विभागाने 9 कोटी 1 लाख रुपयांचे प्रमाणपत्र दिले, असे पुसद विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ते पुंडलिक शिंदे यांना सांगितले. नव्हे तर त्याची लेखी प्रमाणित प्रतही दिली. आता ही करामत टेंडर लिपिकाची असण्याची शक्यता शिंदे यांनी वर्तवली आणि तशी तक्रार पुसदच्या वसंत नगर पोलिस स्टेशनला दिली. आता यामध्ये बदमाशी कुणी केली? भोकर सा.बां. विभागाने की पुसद विभागाने, या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे.