Assembly Election : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा फेवरेट असलेला पिंक कलर याची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दादा गुलाबी रंगात पाहायला मिळत आहेत. हल्ली दादांनी घातलेल्या पिंक जॅकेटची चर्चा जोरावर आहे. पिंक जॅकेट हा चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. पिंक रंग आणि दादांचं आता एक वेगळेच ‘कॉम्बिनेशन’ झालेलं आहे. त्यामुळे आता अजित पवार म्हटलं की, पिंक रंग हे समीकरण होऊ पाहत आहे.
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत सुद्धा ‘सब कुछ पिंक पिंक’ असेच पाहायला मिळाले. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार शुक्रवारी (ता. 6) अहेरी येथे आले होते . सभेच्या ठिकाणी येण्यापूर्वी त्यांना पिंक फेटा बांधण्यात आला. या फेट्यात दादा अधिकच खुलून दिसत होते. सभेच्या मुख्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टेजवर असलेले बॅनर सुद्धा पिंक रंगाचेच होते.
पोडियमही गुलाबी
बोलण्यासाठी दादा ज्या पोडीयमसमोर आले, ते पोडीयम सुद्धा गुलाबी रंगाच्याच बॅनर ने सजविले होते. एवढेच नाही तर सभा मंडपात पुढे बसलेल्या महिलांनी सुद्धा पिंक रंगाचेच फेटे बांधलेले होते. सभेच्या ठिकाणी काही ठिकाणी गुलाबी रंगाचेच झेंडेही बांधण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार यांना शुभ संकेत देणारा पिंक कलर अहेरीवासीयांनी दादांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट म्हणून दिलेला दिसत होता.
लाडकी बहीण पण गुलाबीच
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोठ्या प्रमाणात आदिवासी भगिनींनी या सभेला उपस्थित राहून दादांवरचं आपलं प्रेम पिंक रंगाचे फेटे बांधून व्यक्त केलं. एवढेच नव्हे तर दादाला बांधण्यात आलेल्या राख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पिंक रंगाच्या असल्याचे दिसून आलं. पर्यावरण पूरक असलेल्या या राख्यांचा उल्लेख दादांनी सुद्धा आपल्या भाषणात आवर्जून केला. आदिवासी बांधव नेहमीच निसर्गपूजक, निसर्ग संरक्षक आणि निसर्गाचा समतोल राखणारा आहे. आदिवासी महिलांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या निर्माण केल्याबद्दल दादांनी आदिवासी भगिनींचा गौरव केला .
महिलांच्या डोक्यांवरचे पिंक रंगाचे फेटे पाहून सुद्धा दादांनी याचा आपल्या भाषणात उल्लेख केला. एकूणच अजितदादांचा फेवरेट असलेला पिंक कलर किंवा दादांचे पिंक जॅकेट हा विषय आता संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयोजकांनी सुद्धा अहेरी सारख्या दुर्गम भागामध्ये पिंक रंग वापरूनच दादांच्या सभेचे आयोजन केलं होतं.