राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण बचाव यात्रा सुरू झाली आहे. आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर प्रत्येक ठिकाणी सभा घेत आहेत. पातूर येथे झालेल्या सभेत आंबेडकरांनी जरांगेंना उपरोधिक टोला लगावला आहे. ‘जरांगे यांचा फोटो घरात लावा. ओबीसी संघटनांना जागृत करण्यात मनोज जरांगे यांचं योगदान आहे,’ असा उपरोधिक टोला आंबेडकरांनी लगावला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण धोक्यात असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.
प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा विविध जिल्ह्यांमध्ये जात आहे. अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये ही यात्रा पोहचली. त्यावेळी भाषणात आंबेडकर म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानतो. जे आम्ही 40 वर्षांत करू शकलो नाही ते त्यांनी 2 वर्षांत करून दाखविले. ओबीसींच्या विविध संघटनांमध्ये चैतन्य निर्माण केलं. आपण आपल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे, याची जाणीव करून दिली. सगळ्यांनी जरांगेंचा फोटो घरात लावावा आणि विधानसभा निवडणूक होत नाही तोवर त्याला एक हार लावा. म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपल्याला ओबीसींसाठी लढायचं आहे’.
गावरान राजकारण करतो
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगेंची भूमिका ‘चित भी मेरी पट भी मेरी’ अशी आहे. गावरान राजकारण करतो, इंग्लिश राजकारण करत नाही. जोवर ओबीसींची टक्केवारी कळत नाही तोवर ओबीसी आरक्षणाला हे स्टे देतात. आकडेवारी नाही म्हणून सभागृहात स्थगिती दिली जाणार. ही पद्धत जिल्हा परिषद महापालिकामध्ये सुप्रीम कोर्टाने अवलंबली. ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर जरांगेंच्या हातातील हत्यार काढून घेतले जाणार. त्यामुळे याच निवडणुकीत ओबीसींनी ओबीसी उमेदवारला मतदान केलं पाहिजे. जेणेकरून ओबीसी समाजाचे 100 आमदार विधानसभेमध्ये असतील’, असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं.