Akola : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यात विदर्भातही महायुतीची पीछेहाट झाली. विदर्भात नागपूर आणि अकोल्यात या दोन ठिकाणी भाजपचा विजय झाला. त्यात आता अकोला लोकसभेचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
अनुप धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. अकोला जिल्ह्यातील उमरदरी येथील गोपाल चव्हाण नामक व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीत 45 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा भाजपने केला होता. पण एक अंकी आकड्यावर समाधान मानावे लागले. अकोला लोकसभा मतदारसंघाचा गड भाजपने सलग पाचव्यांदा राखला. नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. अनुप यांनी आपल्या वडिलांचा अर्थात संजय धोत्रेंचा वारसा पुढे नेला. असे असताना आता अनुप धोत्रेंच्या विजयला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अकोला लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.
याचिकाकर्ता गोपाल चव्हाण यांनी काही आरोप केले आहेत. अनुप धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा ओलांडली, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अकोल्यात झाली तिहेरी लढत!
संपूर्ण राज्यात लक्ष लागून असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत बघायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अकोला लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. मोठी रंगतदार लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली. तिन्ही उमेदवारांकडून मोठे दावे प्रतिदावे करण्यात आले. मतमोजणीत सुरुवातीपासून डॉ. अभय पाटील आघाडीवर होते. मात्र पंधराव्या फेरीनंतर अनुप धोत्रेंनी लीड घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते कायम आघाडीवर राहिले. अखेर अनुप धोत्रे हे जायंट किलर ठरत या मतदारसंघात विजयी झाले. सलग पाचव्यांदा भाजपने हा गड राखला.
4 लाख 57 हजार 30 मते
अनुप धोत्रे यांनी 40 हजार 12 मतांची निर्णायक आघाडी घेतली. टपाली मतपत्रिका मिळून अनुप धोत्रे यांना चार लाख 57 हजार 30 मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना चार लाख 16 हजार 404 मते मिळाली. 40 हजार 626 मतांनी अनुप धोत्रे यांनी अभय पाटील यांचा पराभव केला. ऍड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख 76 हजार 747 मतांवर समाधान मानावे लागले. ते तिसऱ्या स्थानावर राहिले.
याचिकेत नेमके काय आहे?
याचिककर्ता गोपाल चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक आरोप केले आहेत. त्यांनी खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे. हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे. मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांनी याचिकेत म्हटले आहे.