महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : पुतळा उभारणाऱ्याला आपटेला अटक!

Mumbai : कल्याणला बायकोला भेटायला येताच पोलिसांनी पकडले

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुतळा कोसळल्यापासून आपटे फरार होता. विशेष म्हणजे जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट जारी केले होते. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत बायको आणि आईला भेटण्यासाठी आला. त्याच्या कल्याणच्या घरी आला असता पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतले. शिल्पकार सापडल्यामुळे आता या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

असे आहे प्रकरण

सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचं लोकार्पण डिसेंबर 2023 मध्ये झालं. पण अवघ्या आठ महिन्यांनी 26 ऑगस्ट 2024 ला शिवरायांचा हा 35 फुटांचा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारही कोंडीत सापडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याची जाहीर माफी मागितली. पुतळा कोसळल्याच्या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचं आश्वासनही सरकारने दिलं.

असा लागला शोध

या प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटे घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्यामुळे राज्य सरकारनेच त्याला लपवून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. दुसरीकडे पोलिसांनी जयदीपच्या शोधासाठी सात वेगवेगळी पथकं तैनात केली होती. जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर जयदीप याचे कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पण पोलिसांनी तिथे जाऊन जयदीपची पत्नी आणि आई यांची चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याण येथील राहत्या घरी आले. पोलिसांनी तिथे देखील त्यांची चौकशी केली होती. जयदीप सापडत नसल्याने पोलिसांनी लुकआऊट जारी केले होते. अखेर त्याला (4 सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे.

अटकेमुळे कुणाला धास्ती?

राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी घाईघाईत पुतळा करून घेतला होता, असा आरोप विरोधक करीत आहेत. त्यामुळे जयदीप आपटेला अटक झाल्यानंतर चौकशीत काय पुढे येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे आपटेची अटक सरकारसाठी धोक्याची घंटा ठरते का, असंही बोललं जात आहे. या अटकेची धास्ती नेमकी कुणी घेतली आहे, असा प्रश्नही विरोधक उपस्थित करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!