Raver, Jalgaon constituency : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडला. रावेर आणि जळगाव मतदारसंघात मतदान शांततेत झाले. रावेर मध्ये 61.36 तर जळगाव मध्ये 53.56 टक्के मतदानाची नोंद झाली.
राज्यातील 11 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झाले. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान झाले. परंतु अंतिम टक्केवारीत यात काही वाढ होऊ शकते.
मतदानावर बहिष्कार
जळगाव तालुक्यातील रामदेववाही येथे दुचाकीवरील चार जणांना भरधाव कारने उडविल्याच्या घटनेनंतर आरोपींवर कारवाई झाली नाही. त्याचे पडसाद जामनेर, चाळीसगाव व जळगाव तालुक्यात उमटले. रामदेववाडीतील बंजारा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला होता.
वेबकास्टिंग नियंत्रण कक्षातून वाॅच
जळगाव येथील अल्पबचत भवनात स्थापन केलेल्या वेवकास्टिंग नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील मतदान केंद्रातील हालचालींवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसभर ‘वॉच’ ठेवला. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहेरा तरा (जामनेर) येथील मतदार केंद्रावर कुणीही कर्मचारी जागेवर बसलेला दिसला नाही. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सर्वच प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावले आणि संबंधित केंद्रावरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नोटिस बजावण्याचे आदेश दिले.
11 मतदारसंघातील टक्केवारी
चौथ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : नंदुरबार – 67.12 टक्के, जळगाव – 53.65 टक्के, रावेर – 61.36 टक्के, जालना – 68.30 टक्के, संभाजीनगर– 60.73 टक्के, मावळ – 52.90 टक्के, पुणे – 51.25 टक्के, शिरूर – 51.46 टक्के, अहमदनगर – 62.76 टक्के, शिर्डी – 61.13 टक्के, बीड – 69.74 टक्के.