Buldhana Constituency : लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात आले. तरी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातच मतदानात मोठी घसरण पाहावयास मिळाली.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात यंदा सर्वात कमी मतदान नोंदवले गेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 57.27 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला दोन तासांत मतदानाची गती संथ होती. त्यानंतर गती वाढल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. मतदारांनी 40 डिग्री तापमानातही मतदान केले. शहरात सकाळी काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता तर काही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. 331 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 2 लाख 93 हजार 499 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 56 हजार 160 पुरुष तर 1 लाख 40 हजार महिलांचा समावेश आहे.
पाऊस, वादळाचा फटका
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस व वादळाचाही मतदान प्रक्रियेला तडाखा बसला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त 52.24 टक्के सरासरी मतदान झाले होते. मतदानाची ही आकडेवारी थोडीफार वाढेल, असे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी बंद पडले मतदान यंत्र !
मतदाना दरम्यान मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट नादुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले होते. बुलढाणा शहरातील एका केंद्रावर अर्धा तास खोळंबा झाल्याने यंत्रणेची धावपळ झाली. हजारो मतदारांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारसंघातील विविध केंद्रांवर 26 बॅलेट युनिट, 13 कंट्रोल युनिट, तर 25 व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाले होते. मात्र,यंत्रणांनी पर्यायी संयंत्र लावल्यावर मतदान सुरुळीत झाले. दुसरीकडे प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी केंद्राध्यक्ष मतदान मॉक ड्रिल घेतात. तालीम दरम्यान 24 बॅलेट , 12 कंट्रोल युनिट तर 22 व्हीव्हीपॅट बिघडल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही यंत्रे बदलून घेतल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली. बुलढाणा येथील बसस्थानक समोरील प्रशासकीय इमारत मतदान केंद्र क्रमांक 199 येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. परिणामी, मतदान खोळंबले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला.
मोताळा तालुक्यातील कोराला बाजार व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट केंद्रावर देखील असाच प्रकार घडला होता. तर शेगाव येथी छत्रपती शिवाजी महाराज शाळा शिवाजी नगर येथील मतदान यंत्रात बिघाड झाला असल्याने दीड तास मतदान उशिराने सुरु झाले. खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती.
मतदारांच्या माथी ‘डिलीट’चा शिक्का !
मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ दिसून आला. प्रामुख्याने मुस्लिम भागात 15 ते 20 व इतर भागात 20 ते 30 टक्के मतदारांची नावे यादीत नसल्याचे किंवा ‘डिलीट’चा शिक्का असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेक मतदारांची नावे यादीत होती, परंतु त्यावर ‘डिलीटचा शिक्का’ असल्याने या मतदारांना मतदान करता आले नाही, निवडणूक विभागाच्या या बहुचर्चित गोंधळाबाबत शेकडो वंचित मतदारांनी भरउन्हात पायपीट करून निवडणूक अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मदत मागितली. पण साॅरी काही करु शकत नाही, म्हणून त्यांनी मतदारांची घोर निराशाच केली. परिणामी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घसरली, असल्याचा तीव्र संताप जिल्ह्यात व्यक्त होत होता.
मोबाइलच्या प्रकाशात मतदान
जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या इस्लामपूर येथील मतदान केंद्र क्रमांक 41मध्ये आदिवासींचे मतदान असल्याने मजुरीची कामे आटोपून सायंकाळी मतदानासाठी एकच गर्दी झाली. यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने चक्क मोबाइल टॉर्चच्या मतदान प्रक्रिया पार पडली. बुथ क्रमांक 41 मध्ये 1155 पैकी जवळपास 700 मतदारांनी मतदान करताना समस्यांचा सामना केला. या बुथमध्ये लहान लहान आदिवासी वस्त्यातील मतदार असल्याने त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानासाठी दोन ते तीन कि.मी. अंतरावरून यावे लागले. मतदानाची वेळ ही सहा वाजेपर्यंत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आले. त्यातही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रात्री 8.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान घेण्यात आले.