Political War : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024 मधील मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. 20 मे, सोमवारी झालेल्या मतदानाची प्राथमिक टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. हा आकडा 53 टक्के पोहोचला आहे. ही प्राथमिक आकडेवारी असली तरी राजकीय चिंता वाढली आहे. मुलुंड (पूर्व) येथील एक आणि पवई येथील दोन मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) खराब झाली. मशीन बदल्ल्यानंतर पुन्हा मतदान सुरू झाले. ठाण्यातील काही मतदान केंद्रांवरही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
अपक्ष सदस्यांसाठी रिंगणात उतरवलेल्या लोकप्रिय चेहऱ्यांसह तब्बल 116 उमेदवार निवडणूक लढविली. मुंबईतील लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होती. मतदान समाप्त झाल्यावर 20 मे रोजी रात्री दहा वाजता महाराष्ट्रात मतदानाची प्राथमिक टक्केवारी 53.37 टक्के आयोगाने जाहीर केली.
असे आहेत आकडे
मुंबई उत्तर 53.50 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व- 52.37 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 48.80 टक्के मतदान झाले. मुंबई उत्तर-पश्चिम 53.67 टक्के, मुंबई दक्षिण – 46.07 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 51.88 टक्के मतदानाची नोंद झाली. भिवंडी 56.41 टक्के, नाशिक 53.76 टक्के, ठाणे – 49.81 टक्के, कल्याण 46.10 टक्के मतदान झाले.
पालघरमध्ये 61.19 टक्के धुळे मध्ये 56.61 टक्के मतदान नोंदविण्यात आले. दिंडोरीत 62.66 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान समाप्त झाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागणार आहे या निवडणुकीचे महासंग्राम कोण जिंकणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंविरोधात तक्रार
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत महासंग्राम सुरू असताना ही तक्रार झाली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्षचे आशिष शेलार यांनी ही तक्रार केली आहे. ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असा आरोप त्यांचा आहे. ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत.
निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. मतदान संथ करण्यात आल्याचेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. सवयीप्रमाणे त्यांनी आरोप केल्याचे फडणवीस म्हणाले.
मेहुणेचा बहिष्कार
दिंडोरी मतदारसंघातील एका गावाने मतदानावर बहिष्कार घातला. गावातील पाणीटंचाई, पेयजल योजना, शेती आदी प्रश्नांनी लोक त्रस्त आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.