Farmers Issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे भंडारा जिल्ह्यातील रोवण्या खोळंबल्या आहेत. धान पिकाच्या रोवण्या खोळंबल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. आणि पुरुष वर्ग यासाठी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवत आहे. अर्थात याचे कारण ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमध्ये दडले आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ही योजना आणली. आणि आता शेतीची कामे सोडून महिलांनी सेतू कार्यालयाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शेतात रोवणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.
राज्य शासनाने महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना आमली. कागदपत्रे काढण्यासाठी सध्या महिलांची तहसील कार्यालय व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतमजूर मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. अनेक दिवसांपासून मजूर मिळत नसल्याने शेतांमध्ये रोवणीसह अन्य कामे रखडली आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज पाऊस बरसत असल्याने शेतकरी रोवणीवर जोर देत आहे. रोवणीसाठी गावातील महिला सज्ज असतात. मात्र, सध्या ‘लाकडी बहीण’साठी कागदपत्र तयार करण्यासाठी महिला धावपळ करताना दिसत आहेत.
लाडकी बहीण योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिला आवश्यक कागदपत्र काढण्यासाठी तहसील, तलाठी, बँकेच्या कार्यालयात रांगा लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावागावात, शेतांमध्ये काम करण्यास महिला मिळेना झाल्या आहेत, अशी स्थिती ओढावली आहे.
शहरातही अडचण
ग्रामीण भागच नव्हे, तर शहरी भागातदेखील कामगार व मजूर महिला कामावर येत नसल्याची तक्रार होऊ लागली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा होताच महिलांनी त्याचा लाभ घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
पुरुषांची मनधरणी
आतापर्यंत पावसाने साथ दिली नसल्याने रोवणीची कामे पाहिजे तेवढी झाली नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. अश्यात साचलेल्या पाण्याचा फायदा घेत शेतकरी रोवणीसाठी जोर लावत आहेत. मात्र, रोवणीसाठी महिलांची गरज आहे. पण ‘लाडकी बहीण’ची कागदपत्र तयार करणे व अर्ज भरण्यात महिला व्यस्त आहेत. अशात पुरुषांची मनधरणी करावी लागत आहे. नेमकी हीच बाब हेरून पुरुषांनी मजुरीचे दर वाढविले आहेत.