विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसऱ्या आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी जनता महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यापूर्वीही त्यांची विधानं चर्चेत आली आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांविरोधात त्यांनी मोर्चा उघडला आहे. हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ते म्हणाले. 4 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रात मोठा स्फोट होईल असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा राज्यात बिगुल वाजला आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवार ठरवले जात आहेत. तर आयाराम गयाराम यांची संख्याही वाढत आहे. दरम्यान राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असतानाच तिसऱ्या आघाडीच्या नावाने परिवर्तन महाशक्ती समोर आली आहे. परिवर्तन महाशक्तीचे नेतृत्व करणाऱ्या बच्चू कडू यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, ‘आम्हाला उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचं आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होत असते.’ ‘माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Assembly Election : रामटेक भाजपमध्ये भूकंप; रेड्डींच्या निलंबनानंतर राजीनाम्यांचे सत्र!
दोघांचाही एन्काऊंटर
राजन तेली किंवा त्याबद्दल मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची बातमी तुम्ही चालवली, कशी झाली मला माहिती नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो. आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार आहे. राज्यातील जनता ही महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
भाजप-काँग्रेस एकच आहेत
या दोघांच्या जागा वाटपमध्ये तिढा आहे. भाजप काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर केली. तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडे आलेले दिसतील. युती आणि आघाडीला पहिले पाडायचे आहे, असं ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. जसे इतर पडतात तसे तेही पडतील, असा दावाही त्यांनी केला.