Bhandara Gondia Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता लागू आहे. 16 मार्चपासून सुरू झालेली आचारसंहिता लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत, म्हणजेच 4 जूनपर्यंत कायम राहणार आहे. या काळात कोणतीही विकासकामे सुरु करण्यास, उदघाटन करण्यात तसेच मतदारांवर प्रभाव पडेल अशी कामे करण्यास प्रतिबंध असतो. या निवडणुकीनंतरही भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या निवडणुका असल्याने आचारसंहितेचा फेरा वर्षभर सुरूच राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
देशात दर 5 वर्षांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतात. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे या काळात आदर्श आचारसंहिता जाहीर केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता जाहीर करतो. त्यामुळे प्रशासनाची सूत्रे अप्रत्यक्षरित्या जिल्हा प्रशासनाकडे जाते. जिल्ह्यातील विकासकामे, कार्यारंभ आदेश, सार्वजनिक सभा, यावर अप्रत्यक्षरीत्या निबंध येतात. जिल्ह्यात सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. यानंतर विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यासाठीच्या निवडणुका राज्यात जाहीर होतील. त्यामुळे तेव्हा आचारसंहिता लागेल.या निवडणुका पूर्ण होत नाही तोच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यात आचारसंहिता लावेल. सध्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत पदाधिकारी येतील, तेव्हा ही निवडणूक होऊ शकते.
परिणामी विकासकामे रखडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वाधिक फटका बसणार आहे.जून महिन्यात शाळांचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होते. आचारसंहितेमुळे पाणीपुरवठा योजनांची कामे, रस्ते व अन्य कामांच्या निविदा मंजुरी, नवीन नियुक्त्या यासह विकास योजनांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या बैठका बंद आहेत. पंचायत समिती व ग्रामपंचायतींना नवे ठराव घेता येत नाही.आता मतदान आटोपल्याने आचारसंहितेत अंशतः तरी शिथिलता मिळणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.