Bhandara : भंडारा जिल्हाच्या साकोली तालुक्याच्या पाथरी गावाने विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या निर्णयाने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार उभे होणार आहेत, त्यांचे टेंशन वाढले आहे. या निर्णायासाठी मोठं कारण गावकऱ्यांनी दिलं आहे. दीड वर्षांपूर्वी पाथरी गावासाठी पोलीस पाटील पदाचे आरक्षण निघाले होते. परंतु पाथरी गावासाठी पोलिस पाटलाचे पद भरण्यात आले नाही. त्यामुळे दीड वर्षांपासून शासनाच्या महसूल विभागाकडून अन्याय होत आहे, अशी भावना गावकरी व्यक्त करत आहेत.
पोलीस पाटील हवा
या संदर्भात गावकऱ्यांनी निवेदन देऊनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळत आहे. सतत पाठपुरावा करूनही अपयश येत आहे. त्यामुळे जोपर्यंत गावात पोलीस पाटील पदाची भरती होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे गावकऱ्यांनी ठरविले आहे. आता गावकऱ्यांची समजूत कशी काढायची, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडलेला आहे.
प्रसिद्धी काढण्यात आली
साकोली महसूल विभागाकडून 2023 मध्ये गावनिहाय पोलीस पाटील पदाचे आरक्षण व महिला सोडत आरक्षण काढण्यात आले. तशी प्रसिद्धी 9 मार्च 2023 च्या पत्रकातून करण्यात आली. यात साकोली उपविभागातील रिक्त पोलीस पाटील पदाकरिता साकोली 34, लाखनी 40 आणि लाखांदूर 27 अशा एकूण 3 तालुक्यांतील 101 जागांसाठी मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे समावेश होता. आरक्षण सोडत काढण्याकरिता 9 मार्च 2023 रोजी सकाळी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली या ठिकाणी सभेचे आयोजनही करण्यात आले. त्यानुसार साकोली तालुक्यातील साकोली पोलीस स्टेशनअंतर्गत पाथरी गावासाठी भा.ज.ब. (एन.टी.) महिला राखीव सोडत निघाली. तशी आरक्षण सोडतची अंतिम यादीदेखील प्रकाशित झाली.
परंतु उपविभागांतर्गत सर्व पोलिस पाटलांच्या जागा भरण्यात आल्या. असे असताना दीड वर्षांपासून शासनाच्या महसूल विभागाकडून या गावचे पोलीस पाटील पद भरले गेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांवर प्रशासकीय अन्याय होत आहे. या संदर्भाचे निवेदन महसूल विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
Farmers Demand : गोळ्या खाऊन मारायला तयार; कृषिमंत्र्यांचाही आला फोन
नाना पटोलेंचा मतदारसंघ
दरम्यान पाथरी गाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात येते. राज्यात राजकिय दृष्टया सर्वांत महत्त्वाच्या मतदारसंघात चक्क एका गावाने निवडणुकीवर बहिष्कार घालणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वतः पाथरीवासियांच्या मागणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.