Maharashtra Assembly : रुपेरी पडद्यावरील फिर हेरा फेरी हा चित्रपट आठवतोय का? चित्रपटात भूमिका करणारे अभिनेता मनोज जोशी आणि अक्षय कुमार यांच्यातील ‘डेढ़ सौ देगा’ हा डायलॉग प्रचंड गाजला. त्यावरून अनेक रील्स आणि मिम्सही तयार झालेत. आता हाच डायलॉग लोकांना पुन्हा एकदा आठवला जेव्हा प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढविणार हे जाहीर केलं. ‘डेढ़ सौ लेगा’ असा त्याचा सरळसरळ अर्थ होता.
बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी, महायुतीपासून फारक घेत तिसऱ्या आघाडीची मुहूर्तमेढ रोवली. आता ही तिसरी आघाडी राज्यात 150 जागांवर निवडणूक लढविणार आहे. परिवर्तन महाशक्ती असं या तिसऱ्या आघाडीला नाव देण्यात आलं होतं. या आघाडीची गुरुवारी (17 ऑक्टोबर) बैठक पार पडली. बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. अनेक लोक या आघाडीकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
राजकीय घडामोडींना वेग
राज्यात 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीची घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. जागा वाटपही अंतिम टप्प्यात आलं आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीनंतर राज्यात तिसरी आघाडी म्हणून समोर आलेली परिवर्तन महाशक्ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. परिवर्तन महाशक्तीची बैठक पुणे झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू म्हणाले, ‘सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु. आम्ही चांगले उमेदवार देणार आहोत. पवार म्हणतात परिवर्तन आणू. तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात?’ असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. इतके दिवस सत्तेत होते. मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही त्यांनी केला.
आपला अधिकार
परिवर्तनाचा अधिकारी युतीला नाही. आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार तिसऱ्या आघाडीला असल्याचे कडू म्हणाले. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल. बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असल्याचे कडू यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील बोलणं सुरू आहे. ते सोबत येतील असे प्रयत्न सुरू आहेत. महादेव जानकर देखील सोबत येतील, असा विश्वास महाशक्तीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Ravikant Tupkar : राजू शेट्टी यांच्याबद्दल काय बोलून गेले रविकांत तुपकर
मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपलं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं, अशी आमची भूमिका असल्याचं संभाजीराजे म्हणाले. राज्यात आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस झाले आहेत. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे नेते यावेळी म्हणाले.