Assembly Election : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची हाक दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला आहे. या दोन्ही नाऱ्यांमु्ळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असताना माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यावर भाष्य केले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा विरोधक वेगळा अर्थ काढत आहेत. यावरून महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. काही संभ्रमसुद्धा नाही. निवडणुकीत फूट पडून मतांचे विभाजन होऊ नये, हा याचा अर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने 46 हजार कोटींची लाडकी बहीण योजना अमलात आणली. महिलांना या योजनेचा लाभ झाला. यामुळे महिलांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे भाजपच्या रॅलीत महिला मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. बहिणींच्या आशीर्वादाने नक्कीच महायुती विजय होईल, असा दावा डॉ. फुके यांनी केला. डॉ. परिणय फुके यांच्यावर भाजपने एकूण 15 मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. यासंदर्भात डॉ. फुके यांनी भाष्य केलं.
पटोलेंवर टीका
डॉ. फुके म्हणाले, साकोलीच्या जनतेने पाच वर्षांपासून आमदार बघीतला नाही. नाना पटोले राज्यभर फिरत आहेत. साकोलीच्या जनतेला ते गृहित धरतात. त्यामुळे यावेळी त्यांना साकोलीचीच जनता धडा शिकवणार आहे. नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच केले नाही. त्यांनी एकही उद्योग आणलेला नाही. एकही विकास प्रकल्पाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीर लक्ष दिले. बेरोजगारी, महागाईकडं लक्ष दिलं आहे.
आपल्या मतदारसंघात यासर्व गोष्टींकडे बघण्यासाठी पटोले यांच्याकडे वेळच नाही. मुख्य म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारावर त्यांनी बोलायला हवे. नाना पटोले यांचे साकोली विधानसभा मतदारसंघाचे लक्ष नाही. केवळ विरोधकांवर टीका करणे एवढचे त्यांना येते, असेही डॉ. फुके म्हणाले. डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना वडेट्टीवार यांनी टार्गेट केले होते. परंतु विजय वडेट्टीवार हे मूळचे तेलंगणातील ते म्हणाले. त्यांना ब्रह्मपुरीतून परत आपल्या गावी पाठविण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले. आता वडेट्टीवार हे त्यांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरीचे आमदार अल्पसंख्यक आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी परिवर्तन करण्याचे आवाहन कुणबी समाजाच्या मेळाव्यात केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता, याकडंही लक्ष वेधण्यात आलं.