Bhandara-Gondia Constituency : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी नकार दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने आपणास देखील लढण्याचे स्वारस्य राहिलेले नाही, असे म्हणत डॉ. फुके यांनी भाजपकडून आपली दावेदारी मागे घेतली आहे. भंडारा हा नाना पटोले यांचा गृहजिल्हा आहे. त्यामुळे फुके विरुद्ध पटोले अशी लढत झाली असती तर सामना खूपच रंजक राहिला असता असे अनेकांचे मत आहे.
डॉ. फुके यांनी सांगितले की, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाच्यावतीने आपण निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना आव्हानही दिले होते. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलेच नाही. पटोले यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे आपल्याला देखील आता स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळे निवडणूक लढायची नाही, असे आपण पक्षातील वरिष्ठांना कळविले आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपने उमदेवार जाहीर केला आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे देखील डॉ. फुके यांनी सांगितले.
माजी मंत्री डॉ. परिणय फुके हे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांपैकी एक आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे निवडणूक रिंगणात असते तर पटोले विरुद्ध फुके हा सामना खूपच चूरशीचा ठरला असता असे अनेक जाणकारांचे मत आहे. परंतु पटोले हे मैदानात उतरलेच नाही त्यामुळे मनासारखा प्रतिस्पर्धीच न मिळाल्याने फुके यांनी देखील उमेदवारीसाठी अनावश्यक जोर लावला नाही, असे सांगण्यात येत आहे. फुके हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात बरीच कामे केली आहेत. त्याचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीत नक्कीच होणार असल्याचे चित्र आहे.