शिक्षकाच्या नियुक्तीची मागणी करताना पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे. या अनोख्या आंदोलनाची सध्या राज्यभरात चर्चा आहे.
गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात बुटाई येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळेत सात वर्ग आहेत आणि शिक्षक फक्त चार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वांरवार मागणी करूनही शिक्षण विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी 29 जुलैपासून शाळेतच पाठविणे बंद केले आहे.
आधी शिक्षकांची नियुक्ती करा, नंतर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू, अशी भूमिका आता पालकांनी घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले आहे. शिक्षण विभागाने यावर अद्यापही कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पालकांमध्ये रोष कायम आहे.
बुटाई येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. एकूण 141 विद्यार्थी आहेत. यात इयत्ता पहिलीमध्ये 16, दुसरीमध्ये 23, तिसऱ्या वर्गात 18, चौथीमध्ये 35, पाचवीत 20, सहावीत 17 आणि सातव्या वर्गात 12 विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. शाळेत सहावी ते सातव्या वर्गासाठी गणित आणि विज्ञान या विषयांकरिता शिक्षकांची कमतरता आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत बुटाई नंबर एक यांनी 17 व 19 जुलैला वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले आणि शिक्षकाची मागणी केली होती. 29 जुलैपर्यंत शिक्षकाची नियुक्ती न केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, अशा इशारा सुद्धा पालकांनी दिला होता. मात्र शिक्षण विभागाने त्याची दखल न घेतल्याने गेल्या तीन दिवसांपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. शिक्षण विभागावर रोष व्यक्त केला आहे.
शिक्षक कमी झाले
केंद्र महागाव अंतर्गत जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा बुटाई नंबर एक येथे वर्ग एक ते सात आहेत. शाळेची पटसंख्या 141 आहे आणि शाळेत एकूण पाच शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी सहायक शिक्षक मनोहर शहारे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरामटोला केंद्र राजोली येथे शैक्षणिक कार्यासाठी प्रतिनियुक्त्ती करण्यात आली आहे. परिणामी बुटाई येथील शाळेतील शिक्षकांची संख्या चार झाल्याने अडचण होत आहे.
पालक भूमिकेवर ठाम
गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यशवंत गणवीर, पंचायत समिती सभापती सविता कोडापे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, पंचायत समिती सदस्य विलास लांडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महागावचे केंद्रप्रमुख भारत बोरकर यांना शिक्षक मागणीपत्र बुटाई येथील शाळा व्यवस्थापन समितीने पाठविले होते. पण त्यांनी सुद्धा याची दखल घेतली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे पालक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.