Oath Ceremony In Nagpur : उपराजधानी नागपूरमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर अनेक मंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेत्या तथा नवनियुक्त मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सकारात्मक पद्धतीने काम करणार आहे. गेल्या अनुभवाबद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोण काय बोललं, कोणी काही टीका केली यावर आता आपण बोलणार नाही. आपण केवळ आपल्या कामापुरतं आणि सकारात्मक बोलणार आहोत. त्यामुळे अशा कोणत्याही वादामध्ये आपल्याला पडण्याची इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच निर्माण होऊ पाहणारा वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
अज्ञातवास संपला
भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा मुंडे या अनेक दिवसांपर्यंत अज्ञातवासामध्ये होत्या. पक्ष नेतृत्वाने निवडलेल्या नेत्यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता. आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत, असे भाष्यही त्यांनी केले होते. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना अनेक दिवसांपर्यंत ‘साइड ट्रॅक’वर ठेवले होते. गेल्या निवडणुकीतही त्यांना पक्षाने साथ दिली नव्हती. अनेक दिवस उपेक्षित राहिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अखेर ‘कमबॅक’ केले. त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टीने आता विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतले आहे.
Maharashtra Cabinet : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाड्याचा डंका
विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना आमदारकी दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटत होते. त्यानुसार त्यांना नागपुरात झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्यानंतर चौदाव्या क्रमांकावर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. शपथविधी आटोपल्यानंतर प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोणतीही वादग्रस्त टिप्पणी यापुढे आपण करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा कोणत्याही विषयावर बोलणं हे आपलं काम नाही. मंत्रिमंडळामध्ये जी जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात येईल, त्या विषयावरच आपण बोलणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पक्षामध्ये काम करताना यापूर्वी आलेल्या अनुभवातून पंकजा मुंडे आता बरेच काही शिकले आहेत, असे यातून दिसल्याच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. शपथविधीदरम्यान मात्र पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या नावाचा उच्चार करताना जाणीवपूर्वक जोर दिल्याचं जाणवलं. विशेषता त्यांनी पंकजा आणि गोपीनाथ या दोन शब्दांवर छोटे छोटे ‘पॉज’ घेतले. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे आपल्या वडिलांच्या पुण्याईचे स्मरण लोकांना करून तर देत नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे मुख्य प्रवाहात आलेल्या पंकजा मुंडे यांची कारकीर्द कशी असणार, हे आता बघण्यासारखे राहणार आहे.