Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. बीडच्या लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे या पुन्हा सक्रिय होतील की नाही, याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत होते. दुसरीकडे पक्ष नेमकी त्यांना कोणती जबाबदारी देईल याबाबतही चर्चा होत असतानाच, त्यांना आता विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये पंकजा मुंडे यांची ही एमएलसी निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपने प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांच्यासाठी भाऊ, मंत्री धनंजय मुंडेंनीही (Dhananjay Munde) पूर्ण ताकद लावली. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजंरग सोनावणे यांनी मुंडे यांना निसटत्या पराभवाचा धक्का दिला. पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजप संधी देईल की नाही, याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत होते. त्यानंतर झालेल्या चर्चांवरून पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती.
मराठा-ओबीसीत मतभेद
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. राज्यात ओबीसी समाजाच्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची जास्त शक्यता होती. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाकडून भाजपला चांगली मते मिळू शकतात] असेही बोलले जात होते. अखेर मुंडे यांना संधी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने, आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यांना संधी मिळाल्याने त्यांचा राजकीय वनवास संपला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? अशा चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लक्षात घेता पंकजा मुंडे यांच्यासारखा ओबीसी चेहरा राज्यात भाजपसाठी लाभदायक ठरणार असल्याने, मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेसाठी भाजपने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.