BJP News : ‘तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे, माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका,’ असे, भावनिक आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समर्थकांना धक्का बसला आहे.
काही ठिकाणी तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले आहे. अनेक गावात चुली पेटल्या नाहीत. या साऱ्या घटनांनी व्यथीत झालेल्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या आत्महत्या केलेल्या तरूणाच्या नातेवाईकांशी पंकजा यांनी संपर्क साधत कुटुंबाचे सांत्वन केले. मुंडे परिवाराला धीर दिला.
भावनिक पोस्ट
ट्विट करून मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे. संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा. संयमाने राहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. मी स्वीकारला आणि पचवला आहे. पराभव तुम्हीही पचवा. अंधाऱ्या रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक रहा. प्लिज, प्लिज.. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा.. आई बापाला दुःख देऊ नका.. त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची. 15 जूनपासून मी आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्व जण प्रतीक्षा करा’, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
PM Oath Ceremony : उपयुक्तता संपली की माणसं ‘डस्टबीन’मध्ये जातात
बीड परिसरात तणाव
निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पराभवानंतरही त्यांच्या समर्थकांनी बीड परिसरात आंदोलन केले. पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर पंकजा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यातच रविवारी (ता. 9) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंकजा यांनी हजेरी लावली.
भाजपने सर्वेक्षण केल्यानंतर पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. त्यानंतर एका युवकाने पंकजा यांच्या संदर्भात सोशल माध्यमावर पोस्ट टाकली. त्यानंतर या भागात तणाव होता. अशातच रविवारी बीड आणि आसपासच्या परिसरात बॅनरबाजी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंकजा यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. पण ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर एका समर्थकांने आत्महत्या केली. त्यामुळे पंकजा मुंडे व्यथीत झाल्या आहेत. रविवारी पंकजा यांनी दिल्लीतील शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून होत्या.