Congress : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तब्बल 25 वर्षांनंतर कमबॅक केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीत प्रचारापासून ते सभांचे केलेले सूक्ष्म नियोजन आणि महाविकास आघाडीची बांधलेली मोट यामुळे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासारखा नवखा उमेदवार देऊनही त्यांना निवडून आणण्यात पटोले हे यशस्वी झाले. पडोळे यांच्या विजयाने जिल्ह्यातील काँग्रेसमधील मरगळ बऱ्याच प्रमाणात दूर झाली असून, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पण लोकसभेत मिळालेले हे यश तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासमोर असणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकावण्याची किमया करणारे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यामुळे पक्षाला नवचैतन्य मिळाले आहे. तब्बल 25 वर्षांनंतर जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळाली आहे. पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एकजूट टिकविण्याचे पहिले आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधून विधानसभेतही पक्षाचा करिष्मा कायम ठेवण्याची कसोटी पडोळे यांची लागणार आहे.
दणदणीत विजय..
या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे 37 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपचे सुनील मेंढे यांचा पराभव करीत त्यांचे दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंग केले. काँग्रेसला मिळालेल्या या यशाने विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण गोंदिया, भंडारा, तिरोडा या मतदारसंघांत तगडा तोडीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी विधानसभेतही कायम राहिल्यास मतदारसंघाचे नियोजन करून उमेदवारी ठरविण्याचे आव्हान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर असणार आहे.
Shiv Sena : स्वतः मलईदार खाते ठेऊन नितीश, चंद्राबाबूंकडे खुळखुळा सोपविला
या मतदारसंघातील निवडणूक ही काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्याविरुद्ध भाजपचे सुनील मेंढे यांच्यात झाली असली, तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्य व देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत पडोळे यांच्या विजयाने पटोले यांची उंची वाढली. शिवाय विदर्भात मिळालेल्या यशाने पटोले यांच्या सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.