Nitin Gadkari : मागील 10 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते आणि पायाभूत सुविधा पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर झालं. महामार्गांच्या माध्यमातून गावं-तालुक्यांची ठिकाणं मोठ्या शहरांना जोडण्यात आली. यामुळे गावांचा प्रगतीचा मार्ग अधिक सुकर झाला. यापुढेही स्मार्ट सिटी सोबतच स्मार्ट व्हिलेजची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. आजवर दाखवलेला विश्वास जनता यापुढेही दाखवेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
पूर्व विदर्भातील मतदान आटोपल्या नंतर नितीन गडकरी प्रचारात गुंतले. बुधवारी ते महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी चिखली येथे आले असता प्रचार सभेत बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, “मी जे बोलतो ते करुन दाखवतो. तूर, गहू, तांदूळ लावून शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी अन्न पिकवून सर्व जनतेची सोय केली. बळीराजा मात्र, सुखी-समृद्ध झाला नाही. खताच्या, बियाण्याच्या, कापडाच्या किंमती वाढल्या. तसेच गहू महाग झाला. ब्रेड, बिस्कीट महाग होतात. संत्रा-मोसंबी स्वस्त होतात आणि ज्यूस महाग होतो. आमचं सरकार 2004 पासून लढत होतं. त्या काळात 16 लाख कोटी रुपयाचे पेट्रोल, डिझेल इंधन आयात करत होतो. उसाच्या रसापासून, मळीपासून, बांबूपासून आणि सडलेल्या अन्नापासून इथेनॉल आपल्या इथे तयार होत आहे. त्यामुळं इंधनाची आयात कमी झाली असून, देशावर इंधनाच्या लागणारा खर्च कमी झाला.”
विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 एप्रिलला मतदान आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या निवडणुकीच्या कामातून मुक्त होताच त्यांनी राज्यात सभांचा धुरळा लावलाय. चिखलीला व्यासपीठावर उमेदवार खा. प्रतापराव जाधव, आ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, खा. सुखदेव काळे, आ. श्वेता महाले, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपाचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर, शिवसेनेच्या ज्योतीताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.