महाराष्ट्र

Assembly Elections : फडणवीसांपुढे गुडधेंचे नव्हे ‘नरेटिव्ह’चे आव्हान!

Devendra Fadnavis : अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये प्रचाराचा जोर

विरोधकांतर्फे सध्या सर्वाधिक टार्गेट कोणाला केले जात असेल तर ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. खापर कोणतही असो मात्र बादरायण संबंध जोडून ते फडणवीसांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. त्यामुळे राज्यभरात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचेही प्रयत्न होतात. या पार्श्वभूमीवर फडणवीस लढत असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातही ते कसे बाद होतील यासाठी विरोधक कामाला लागले आहेत. त्यामुळेच संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. माजी मुख्यमंत्र्याचा आणि विद्यामान उपमुख्यमंत्र्याचा हा मतदारसंघ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत तो कामय राखणे फडणवीसांना फार अवघड नाही. पण त्यांच्यापुढे काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधेंचे नव्हे तर ‘नरेटिव्ह’चे आव्हान आहे. त्याच कारणांनी त्यांनी अनुसूचित जातीचे जास्त मतदार असलेल्या वस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

काँग्रेसने प्रफुल गुडधे यांना येथे उमेदवारी दिली आहे. दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेले विनोद गुडधे यांचे ते चिरंजीव आहेत. विनोद गुडधे हे भाजपचे नागपुरातील पहिले आमदार आहेत. युती सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. मात्र पुढे त्यांनी भाजपला रामराम ठोकला. आता त्यांचे चिरंजीव फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत. कुणबी चेहरा म्हणून काँग्रेसने त्यांना पुढे आणले आहे. मिहानच्या पुनर्वसनात गेलेल्या शिवणगाव, सोनेगावपासून तर अंबाझरी तलावापासून मेडिकल चौकापर्यंत असे मोठं क्षेत्र दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येते.

सुरुवातीला हा पश्चिम नागपूर मतदारसंघ होता. फडणवीस यांना पहिल्यांदा आमदार याच मतदारसंघाने केले होते. 1999 साली ते अशोक धवड या काँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून येथून विजयी झाले. त्यानंतर 2004 सालीही ते येथूनच निवडून आले. 2008 साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि दक्षिण-पश्चिम नागपूर हा नवीन मतदारसंघ तयार झाला. 2009 पासून ते सातत्याने येथे विजयी होत आहेत. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांना 27 हजार मतांनी पराभूत केले होते. आता ठाकरे पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत.

दक्षिण पश्चिममध्ये 2014 पर्यंत फडणवीसांचे मताधिक्य चांगले होते मात्र 2019 मध्ये ते नऊ हजारांनी कमी झाले. आता 2024 च्या निवडणुकीत मताधिक्य आणखी कमी होते की वाढते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कारण एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचे या मतदारसंघातील मताधिक्य ३२ हजारांनी कमी झाले होते. त्यामुळेच भाजपचे टेंशन वाढले आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ ओबीसीबहुल आहे. त्यातही कुणबी मतदारांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ अनुसूचित जाती आणि ब्राह्मण मतदार येतात. तसेच सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. या मतदारसंघातला अनुसूचित जातीचा मतदार कधीच भाजपच्या बाजूने नव्हता. हा मतदार काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. पण, कधी भारिप बहुजन महासंघ, तर कधी बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमुळे दलित मतांचे विभाजन झाले. 2009 साली भारिप बहुजन महासंघ आणि अपक्ष उमेदवार असे दोघांनी मिळून जवळपास 20 हजार मतं घेतली.

याउलट येथे कुणबी मतदारांचा देवेंद्र फडणवीसांना नेहमीच पाठिंबा मिळत आला. पण गेल्या दोन वर्षात मरठा आणि ओबीसी या मुद्यांचा परिणाम येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीनंतर अनुसूचित जातीचे मतदार आहेत. या भागात रामेश्वरीसारखा मोठा परिसर, रामबाग, जयताळा, एकात्मता नगर इकडे अनुसूचित जातींचे मतदार अधिक आहेत. त्यामुळे येथे फडणवीसांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. या समाजाची काही मतं वळवता आली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

आधी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांचे राजकीय वजन जास्त आहे. ते राज्याचे नेते आहेत. त्याचा फायदा मतदानात होऊ शकतो. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे हे जयताळा परिसरातले रहिवासी आहेत.जातीय समीकरण हे फडणवीसांसमोरचे आव्हान आहे.पण, दुसरीकडे त्यांनी नागपुरात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे जातीय समीकरणे विरुद्ध विकास कामे अशीच ही निवडणूक होईल असे चित्र आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!