(या लेखातील मते लेखकाची आहेत, या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही.)
आई वडील आपल्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी तिच्या सासरी जाताना काही तरी भेटवस्तू अवश्य घेऊन जातात. सोबत विविध खाद्य पदार्थांची रेलचेल असते. निखळ प्रेमातून जिव्हाळ्यातून हे आपसूकच घडत असते. आई बाबांची भेट हा सर्वात आनंदाचा क्षण असतो. मुलीला काही देणे हा सोपस्कार किंवा व्यवहार नसतो. त्यात रक्ताच्या नात्याची घट्ट वीण असते.
भेटीची निखळ ओढ असते. शब्दातीत आत्मियता असते. अगदी सहज हे सारे घडत असते. त्यात कुठल्याच संशयाला जागा नसते. कौटुंबिक नाती गोती जपण्याचा हा प्रघात पूर्वापार चालत आलेला आहे.
बंड्याले भातकं
दिवसभर काबाडकष्ट करून रात्री आपल्या घरी परत येणारा बाप आपल्या सोबत लहानग्यासाठी खाऊ घेऊन जातो. बाबांनी आणलेले चणे, मुरमुरे ,फुटाणे खाण्यासाठी मुलांच्या उड्या पडतात. ‘बंड्याले भातकं’ नावानं हा अवीट गोडीचा खाऊ ओळखला जातो. वरील दोन्ही प्रकारांत देण्या-घेण्यावर कुणीही आक्षेप घेत नाही. नातं जपण्याचा तो एक भाग असतो. इथे कुणाच्याच कुणापासून काही अपेक्षा नसतात.
अपेक्षा ठेवून काहीतरी मिळवण्यासाठी जे सोपस्कार केले जातात, त्याला आपण व्यवहार म्हणतो. मोठमोठे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, पुरवठादार व असेच काही घटक आपले काम ‘ओके’ करून घेण्यासाठी बरेच काही करतात. समर्पक सदिच्छा भेटी, भेटवस्तूंचे आदानप्रदान प्रेमपूर्वक होते. संबंधित यंत्रणा व त्यांचे अधिकारी सदैव प्रसन्न रहावेत, यासाठीचा हा खटाटोप असतो. ही श्रुंखला बरेच ठिकाणी बघायला मिळते. सुरू असलेल्या या प्रकारावर अधूनमधून टिका, आरोप प्रत्यारोप होत असतात. ते लिलया थोपविले जातात. तसेही हिस्से वाटणी सुयोग्य असली तर असे अडथळे सहसा येत नाहीत.
राजकीय पक्षांची धडपड
राजकीय पक्षही आता आपल्या अपेक्षेनुसार यश मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात. नेमके काय केल्याने मतदारांची साथ मिळेल, यावर त्यांचे चिंतन सुरू असते. परिस्थितीचा वेध घेऊन धाडसी निर्णय घेतले जातात. जिंकण्याचे उद्दिष्ट गाठणे हेच एकमेव ध्येय असते.
महायुती अग्रेसर
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) या घटक पक्षांच्या युतीचे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे आणि पुन्हा सत्ता काबीज करण्याचे ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर थेट लाभ मिळवून देणाऱ्या अनेक योजना सुरू करण्यात आल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही त्यातीलच एक. ही योजना खूप लोकप्रिय ठरली. योजनेला महिलांचा प्रतिसाद अभूतपूर्व असा आहे. सहाजिकच महिला वर्गाची बहुसंख्य मते महायुतीकडे वळण्याची शक्यताही आहे.
Vijay Wadettiwar : स्वत: मुख्यमंत्री होण्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी जाहीरपणेच सांगितले
विरोधकांची टीका
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आखण्यात आली. मतांसाठी लाच देण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. सर्व आरोप महायुतीच्या नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. महिलांना आर्थिक आधार मिळावा , त्यांचे सक्षमीकरण व्हावे, हा या योजनेचा उद्देश असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे.
सरकारच्या स्वार्थासाठी योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सरकारच्या स्वार्थासाठी आणली आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महिलांना असे पैसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी नवनवीन उद्योग आणले पाहिजे. त्यांना रोजगार देऊन सक्षम केले पाहिजे, असे ते म्हणाले. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो, असे त्यांनी नमूद केले. राज्य खड्ड्यात घातले जात असेल तर ते चुकीचे आहे असे स्पष्ट मत राज ठाकरेंनी नोंदवले.
या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसा राहणार नाही. तिजोरी रिकामी होईल, अशी स्थिती आहे, असे वास्तव बोलून दाखवले. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. लाडकी बहिण योजनेतून बहिणींना टेबलाखालून लाच देण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
बच्चू कडू यांचा वेगळा सूर
राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी असहमती दर्शवली. आमदार तसेच पगारदार यांच्यावर होणारा खर्च त्यास कारणीभूत आहे, असे नमूद केले. भाजपचे कामठीचे आमदार सावरकर यांनी लाडकी बहिण योजना हा मतांसाठीचा जुगाड असल्याचे वक्तव्य करून पक्षाला घरचा आहेर दिला. याआधी आमदार रवी राणा यांनी या योजनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. जनतेला थेट आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या योजनांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बोचरी टीका केली होती. जब चादर लगी फटने, तो खैरात लगी बटने, असे मार्मिक विधान त्यांनी केले होते.
सुक्ष्म अवलोकन
महायुतीने राज्यातील राजकीय परिस्थितीचे सुक्ष्म अवलोकन करून लाडकी बहिण योजना आणली. योजनेला मिळत असलेला प्रतिसाद बघून विरोधक धास्तावले आहेत. इतर मते विभागली गेली तरी महिला व माता भगिनी यांची मते हमखास आपल्याला मिळावी, हा उद्देश महायुतीचा त्यामागे आहे.
योजनेवर अवाढव्य खर्च
लाडकी बहिण योजना पूढेही सुरू ठेवल्यास त्यावर अवाढव्य खर्च होणार आहे. या खर्चाची तजवीज सरकारने केली आहे, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते. एकाच योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे काही विकास योजना रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. काही योजनांचा निधी या योजनेकडे वळविण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
विजयाचा हुकुमी एक्का
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता विरोधकांना शह देण्यासाठीच महायुतीने मोठी जोखीम उचलली आहे. विजयाचा हुकुमी एक्का म्हणून या योजनेकडे बघितले जात आहे. कारण पुन्हा सत्ता आपलीच येणार, हा शब्द महायुतीला खरा करून दाखवावयाचा आहे.