छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आल्यामुळे विरोधक जखमी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. आणि आता इतिहासतज्ज्ञ असल्यासारखे आरोप करीत आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वाघनखांच्या संदर्भात केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘विरोधी पक्षाचे लोक म्हणजे इतिहासकार किंवा इतिहासतज्ज्ञ नाहीत. टीका करण्याची ही त्यांची पद्धत आहे. आता त्यांना त्याची सवय झालेली आहे. प्रभू रामाचा विषय होता तेव्हा काल्पनिक कथा आहे असं म्हणायचे, राम सेतूचा विषय होता तेव्हाही सुप्रीम कोर्टात गेले.’
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे प्रयत्न महाराष्ट्राने करू नये तर कुणी करावे? पण दुर्दैवाने विरोधकांना फक्त टीका करायची सवय झाली आहे. आणि त्यातही महाराजांची वाघनखे ही महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगातील शिवभक्तांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणं अत्यंत स्वाभाविक आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले. हे सारं मतांचं तुष्टिकरण करण्यासाठी सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते शरद पवारांना विचारा!
अजित पवार यांची घरवापसा होणार आहे का, असा सवाल यावेळी पत्रकारांनी केला. त्यावर मुनगंटीवार यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ‘या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांना विचारायला पाहिजे,’ असे ते म्हणाले. महायुती कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले. ‘अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची मैत्री आहे आणि ती पुढेही कायम राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
वाघ नखांच्या संदर्भात इतिहासकारांनी टीका केली असेल तर त्यात तथ्य असू शकते. त्यावर टीका होणार नाही याची संबंधित मंत्र्यांनी काळजी घ्यावी. जाणकारांचं मत समजून घेतलं पाहिजे. विरोधकच टीका करत आहेत असं नाही. इतिहासकार सुद्धा यावर टीका करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती
शाहू महाराजांचे अभिनंदन
खासदार शाहू राजे यांनी हात जोडून जनतेची माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते म्हणून, झालेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली त्यापेक्षा मोठा काहीच असू शकत नाही. संभाजी राजेंच्यासंदर्भात काय चूक झाली, तो तपासाचा भाग आहे. त्यात काय सत्य आहे ते चौकशीत पुढे गेल्यानंतर कारवाई करावाई करावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
सत्तापरिवर्तन 100%
सर्व पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने काम करतो. संपूर्ण वातावरण आता काँग्रेसच्या बाजूने आहे. त्यामुळे राज्यात 100% सत्ता परिवर्तन होणार, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.