Maharashtra Cabinet : बहुमत मिळाल्यानंतरही महायुती सरकारच्या शपथविधीचे घोडे संथपणे पुढे जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीच्या मुहूर्ताची घोषणा केली आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार? यासंदर्भातील चर्चा जोरावर आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संभाव्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स’ फुटपट्टी लावून मोजणार आहेत. विशेषत: भाजपच्या आमदारांसाठी अमित शाह हे कडक निकष घेऊन बसले आहेत.
भाजपचे महाराष्ट्रातील कोणते आमदार सर्वात दमदार आहेत, याची यादी मोटा भाईंना देण्यात येणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघासह इतरांनाही मदत करणाऱ्यांचा क्रमांक सगळ्यात वर राहणार आहे. ज्या आमदारांच्या सगळ्यात कमी तक्रारी आणि सगळ्यात चांगली वागणूक, त्यांना प्राधान्य राहणार आहे. ज्या आमदारांच्या नावाने त्यांच्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ‘क्रेझ’ आहे, अशांचे पारडे सर्वात जड राहणार आहे.
अनेकांचा जीव मुठीत
केंद्रीय गृहमंत्र्यांनीच आमदारांचे ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’ मागवल्याने आता अनेकांना धडकी भरली आहे. महाराष्ट्रातून अनेक आमदार मंत्रिपदासाठी आस लावून बसले आहेत. अद्याप कोणत्याही आमदाराला मंत्री पदासाठी फोन आलेला नाही. शपथविधी सोहळ्याच्या काही तासांपूर्वी हा फोन येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अनेक आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहे. अमित शाह यांच्यासमोर आपले नाव प्रभावीपणे मांडले जावे यासाठी हे आमदार फडणवीस यांच्या ‘सागर किनारे’ गेल्या अनेक दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
फडणवीस यांची कृपादृष्टी कोणावर होते आणि कोणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडते, याचा फैसला आता केंद्रीय गृहमंत्री घेणार आहेत. दिल्लीमधील पहिली बैठक आटोपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले. मुंबईत परतल्यानंतर सोमवारी (2 डिसेंबर) देखील डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. शिंदे यांच्या अंगात 105 ताप होता. त्यामुळे ताप उतरल्यानंतरही त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी मुख्यमंत्री दिल्लीच्या या बैठकीत जाणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट आहे.
गृहमंत्री पदाचे काय?
शिवसेनेने भाजपला मुख्यमंत्रिपद मोकळे करून दिले आहे. आता शिवसेनेला महसूल आणि गृह हे दोन विभाग स्वतःकडे हवे आहेत. मात्र नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडे गृह खातं ठेवतील, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत गृहमंत्री पदावरही तोडगा निघण्याची शक्यता आहे.