Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील सगळ्यात वजनदार मतदारसंघ असलेल्या सावनेरबाबत काँग्रेसने ठाम निर्धार केला आहे. कितीही काही झालं तरी या मतदारसंघातून केदार यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यानंतर सावनेर मतदारसंघात काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. या मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री सुनील केदार यांना या घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं. न्यायालयाने केदार यांना शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे सावनेर विधानसभा मतदारसंघातून केदार यांच्या ऐवजी कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच काँग्रेसपुढे होता. मात्र काँग्रेसने आता याबाबत निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचा निर्णय
काहीही झालं तरी काँग्रेस केदार यांनाच उमेदवारी देणार आहे. केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्याकडून रकमेची वसुली करावी यासाठी भाजप आग्रही आहे. भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी यावरून निशाणाही साधला होता. सरकारने सुनील केदार यांच्याकडून वसुली करावी अशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी आशिष देशमुख यांनी आंदोलनही केलं होतं. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस केदार यांच्यात सोबत उभी राहणार आहे.
लोकसभेतील किंगमेकर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे लोकसभा निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना विजयी करून दाखवले. निवडणुकीदरम्यान रामटेक लोकसभा मतदारसंघांमध्ये ठोकून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघांमध्ये झंझावाती प्रचार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रामटेकवर लक्ष केंद्रित केले होते. ‘नो बर्वे, ओन्ली राजू पारवे’ असा नारा रामटेक लोकसभा मतदारसंघांमध्ये देण्यात आला होता.
निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आला. ऐन निवडणुकीपूर्वी रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय चुकीचा होता असा दणका दिला आहे. त्यामुळे काही नेत्यांच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं असं आता काँग्रेस बोलू लागली आहे. कोर्टाने दिलेला निर्णय आणि श्यामकुमार बर्वे यांचा विजय यामुळे सावनेरच नव्हे तर काँग्रेसच्या एकूण वर्तुळात सुनील केदार यांचे वर्चस्व वाढला आहे. त्यामुळेच काहीही झालं तरी केदार यांचं नाव विधानसभा उमेदवारांच्या यादीमध्ये असणार आहे.
केदार यांचे नावच नव्हे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास केदार यांना मंत्रिपदाचा बहुमान देखील मिळू शकतो. त्यासाठी केदार यांना संकेतही देण्यात आले आहे. लवकरच काँग्रेस कडून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये केदार यांचे नाव असेल अशी शंभर टक्के खात्री खुद्द केदार यांना वाटत आहे. मात्र हे नाव त्यांचे स्वतःचे राहणार नसून पत्नी अनुजा केदार यांचे राहणार आहे.
Assembly Election : बावनकुळेंची दमदार एन्ट्री; कामठीतून पुन्हा मैदानात
‘द लोकहित’ला माहिती
सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचे नाव काँग्रेसच्या यादीत दिसेल असे आता ठामपणे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर त्यांना सरकार आल्यास मोठा सन्मानही प्राप्त होणार आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘द लोकहित’ला ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत सुनील केदारे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या अत्यंत धार्मिक आहेत. सातत्याने त्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होत असतात. अनुजा केदार या देवीच्या भक्त आहेत असं सांगितलं जातं. नवचंडी, शतचंडी असे अनेक धार्मिक अनुष्ठान अनुजा केदार करतात असं सांगितलं जातं. त्यामुळे नवरात्र नंतर त्यांना देवी आतापर्यंत केलेल्या तपस्येचे फळ देणार असं मानलं जात आहे.