Cleaning Issue : गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाढदिवसामुळे एका परिचराला निलंबित व्हावे लागले आहे. अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती यांच्या दालनापुढे अस्वच्छता झाली. कार्यक्रमानंतर स्वच्छता न झाल्याने कृषी सभापतींनी सामान्य प्रशासन विभागाकडे याची तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच सामान्य प्रशासन विभागाने तातडीने उपाध्यक्ष कार्यालयातील परिचराला निलंबित केले आहे.
बुधवारी (ता. 24) जिल्हा परिषद प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिचराच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील एका मोठ्या नेत्याने गुरुवारी (ता. 25) दुपारी दोनच्या सुमारास आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची भेट घेतली. त्यानंतर निलबंनाचे हे प्रकरण समोर आले. त्यामुळे काम कुणाचे, नाव कुणाचे व कारवाई झाली कुणावर? असा प्रश्न जिल्हा परिषद वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे एका परीचरासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली याचेही अनेकांना नवल वाटत आहे.
राजकीय वजनाचा वापर
शुक्रवारी (ता. 19) रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा वाढदिवस जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. अध्यक्षांनी या शुभेच्छांचा स्वीकार करीत येणाऱ्या अभ्यागतांसाठी अल्पोपहार ठेवला होता. त्याचा स्टॉल जिल्हा परिषद कार्यालयात लावण्यात आला होता. हा स्टॉल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर व कृषी सभापती रुपेश (सोनू) कुथे यांच्या कक्षापुढे होता. वऱ्हांड्यात हा स्टॉल लावण्यात आला होता. त्यामुळे सहाजिकच या वऱ्हांड्यात (कॉरीडॉर) खाद्यपदार्थ, डिश, चहाचे कप पडले. त्यानंतर येथे स्वच्छता होणे अपेक्षित होते.
अध्यक्षांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यक्रम संपला. त्यामुळे स्टॉलवर तैनात सगळेच कर्मचारी थकलेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवार व त्यानंतर रविवारची सुटी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय बंद होते. सोमवारी (ता. 22) कार्यालयाचे काम नियमितपणे सुरू झाले. मात्र या परिसरातील स्वच्छता झाली नव्हती. कचरा पडूनच होता. त्यामुळे कक्षात येताना कृषी सभापती रुपेश कुथे यांना अडचण जाणवली.
कृषी सभापतींनी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांनी लागलीच कारवाई करीत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले. त्यानंतर उपाध्यक्षांच्या कार्यालयातील परिचर जैन यांना स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यांनी ते काम पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. कोणत्याही कर्मचाऱ्याला निलंबित करण्यापूर्वी प्रशासनाने नोटीस देणे अपेक्षित असते. संबंधित कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित असते. मात्र याप्रकरणात थेट निलंबन कारवाई करण्यात आली, असा आरोप होत आहे.
निलंबन कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या परिचर वर्गात खळबळ उडाली. निलंबित कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा नातेवाईक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बड्या नेत्यांने तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. जिल्हा परिषदेच्या एका सभापतीचे पती, जिल्हा परिषद महिला सदस्यांचे पती, एका मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या निलंबन प्रकरणाची चर्चा आता जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे.