Buldhana constituency : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. २६ एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तैनात आहे. या सगळ्या लगबगीत मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एका व्यक्तीकडून एक पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, जळगाव जामोद येथे खरेदी – विक्रीच्या उद्देशाने एक जण पिस्तुल बाळगून होता. शेख जमीन शेख चांद असे या आरोपीचे नाव असून तो जळगाव जामोद तालुक्यातील खेड शिवार भागातील रहिवासी आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक गठीत केले. पाळत ठेवून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळून पिस्तूल, १७ जिवंत काडतूस, दोन मॅगझिन आणि एक मोबाईल फोन मिळाला. असा एकूण ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या आदेशाने, तर अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात खामगाव, बी. बी.महामुनी बुलढाणा, उपविभागीय पोलिस अधिकारी डी. एस. गवळी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष चेचरे, उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार, हेकाँ. दीपक लेकुरवाळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन गोरले, आशा मोरे या स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणाच्या पथकाने केली आहे.
10 लाखांची रोकड जप्त !
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भरारी पथकाने 10 लाख रुपये जप्त केले. बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील टोलनाक्यावर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. बुलढाण्याच्या तहसीलदारांनी या कारवाईला दुजोरा दिला. बुलढाणा चिखली रस्त्यावरील येळगाव टोलनाक्यावर भरारी पथक वाहनांची तपासणी करीत आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास चिखलीकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली. गाडीच्या डिक्कीत १० लाख रुपये आढळून आले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सदर रक्कम आयकर विभागाकडे सोपवण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. ही रक्कम कोणाची? कुणाला देण्यासाठी नेण्यात येत होती? याबाबत सध्या चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.