Election Commission : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या नियमावलीनुसार उमेदवारांना खर्चाची मर्यादा असते. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून जागोजागी प्रचाराचे साहित्य, गाड्या आणि आणखी फंडे दिसून येत आहे. सर्वसाधारण मनुष्याला देखील हा खर्च कोटींमध्ये गेला असल्याची बाब लक्षात येते. मात्र उमेदवारांनी नियमांचाच वापर करत कागदोपत्री काही लाखांचाच खर्च झाला असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. आयोगाकडून वस्त्या व रस्त्यांवर जे चित्र दिसत आहे त्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तीने मर्यादेत बसवून दिलेल्या खर्चाच्या कागदावर जास्त विश्वास ठेवण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात खर्च
निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या खर्चावर निवडणूक विभागाकडून मर्यादा घालून देण्यात आली. उमेदवाराला 40 लाखांच्या आत खर्च करायचा आहे. या खर्चाची माहिती निवडणूक विभागाला सादर करायची असते. पहिल्या टप्प्यातील खर्चाची माहिती उमेदवारांकडून देण्यात आली. उमेदवारांकडून प्रशासनाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दक्षिण नागपूरमधील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी 6 लाख 56 हजार रुपये खर्च केले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार मोहन मते यांनी 1 लाख 54 हजारांचा खर्च केला आहे.
उत्तर नागपूरमधील भाजपा उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी 4 लाख 17 हजारांचा खर्च केला आहे तर काँग्रेस उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी 2 लाख 28 हजारांचा खर्च केला आहे. पूर्व नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार दुनेश्वर पेठे यांनी खर्चात आघाडी घेतली आहे. 2 लाख 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. कृष्णा खोपडे यांनी 1 लाख 60 हजारांचा खर्च दाखवला आहे.
दक्षिण-पश्चिममध्ये भाजपा उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त 64 हजारांचा खर्च दाखवला असून, काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी 2 लाख 91 हजारांचा खर्च दाखवला. तर वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे यांनीसुद्धा 2 लाख 14 हजार 350 रुपयांचा खर्च सादर केला आहे.
विकास ठाकरे
पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी 1 लाखांचा खर्च दाखवला असून, भाजपा उमेदवार सुधाकर कोहळे यांनी 54 हजारांचा खर्च दाखवला आहे. मध्य नागपुरात भाजपा उमेदवार प्रवीण दटके हे विरोधकांच्या तुलनेत खर्चात बरेच आघाडीवर आहेत. त्यांनी 3 लाख 56 हजारांचा खर्च केला आहे तर काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी आतापर्यंत केवळ 44 हजार रुपयांचा खर्च दाखवला आहे.