candidate campaign : विधानसभा निडणूक जाहीर होताच शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या वर्ष दिडवर्षांपासून या हौसे-नवसे-गवसे कार्यकर्ते पूर्वतयारीला लागले आहेत. गेल्या सात आठ महिन्यांपासून हॉटेल, ढाबे, आदी व्यवसायीकांचे व्यवसाय कोलमडून पडले होते. आता निवडणुकीमुळे या व्यावसायिकांना पुन्हा उभारी मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. प्रचारात रॅली, मेळावे, बैठका, सभांचे सत्र सुरू झाले आहे. त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रासह अन्य क्षेत्रांवर झाल्याची ओरड आहे. या निवडणुकांमुळे ठिय्यांवरील मजुरांची संख्या रोडावली आहे. मजूर आता कामासाठी नाही, तर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत उभे आहेत. उमेदवारांना निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही प्रचाराचे प्रकार करावे लागत आहेत, त्यात हजारोंच्या हातांना काम मिळाले आहे. यात मंडप व्यावसायिक, कॅटरिंग, खानावळी, बेरोजगार युवक, ऑटो, ई- रिक्षा, ट्रान्सपोर्टर यांना रोजगार मिळाला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत या लहान-मोठ्या व्यवसायातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे. यातून बऱ्यापैकी कामगारांना रोजीही मिळत आहे.
जेवणावळीत दिवसभर गर्दी
उमेदवारांच्या पाठीमागे भिंगरीसारखे फिरणे, उमेदवाराचे प्रचार कार्यालय राखणे, मतदारांच्या याद्या, घरोघरी चिठ्या पोहोचविण्याच्या कामाला कार्यकर्ते लागले आहेत. त्यामुळे सायंकाळी श्रमपरिहार होणे गरजेचे आहे. रात्रीला शहराच्या बाहेरील धाब्यांवर, खानावळीत गर्दी वाढली आहे.
निवडणुकीचे वातावरण गरम
उमेदवाराच्या प्रचाराचे भोंगे सकाळपासूनच वाजायला लागले आहेत. सध्या उमेदवार विविध वस्त्यांमध्ये कार्यकत्यांसोबत गृहभेटी देत आहेत. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनांचे सत्रही सायंकाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांनी तर पायाला भिंगरीच बांधली आहे, तर कार्यकर्ते त्यांच्या दिमतीला दिवसरात्र कष्ट घेत आहेत.
मजुरांचा ठिय्या ओस; लोक गेले कुठे?
निवडणूक आयोगाने भिंती रंगविणे बंद केल्यामुळे वस्त्या वाड्यांमध्ये कार्यकर्ते पाम्पलेट वाटत आहेत. तर दुपारी महिला मेळावा, सभाही घेतली जात आहे. सायंकाळी आणि रात्रीला कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची चंगळ सुरू आहे.
फेटे, हारांची मागणी वाढली
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला फुलांचे दर वाढले होते. पण, दिवाळीनंतरही फुलांचे दर अजूनही कमी झाले नाहीत. कारण, निवडणुकीमुळे हारांची मागणी वाढलेली आहे. प्रचार रॅली, सभांमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर वाढला आहे. फेटेवाल्यांकडेही निवडणुकीचे काम जोरात सुरू आहे.
Assembly Elections : ज्येष्ठ, दिव्यांगांचे ‘व्होट फ्रॉम होम’!
दिवाळीचा फिव्हर ओसरला
दिवाळीचा फिवर साधारणतः तुळशी विवाहापर्यंत असतो. पण, यंदा दिवाळीपेक्षा निवडणुकीचा ज्वर लोकांमध्ये चांगलाच चढला आहे. सकाळपासून लोक नवीन कपडे, गळ्यात दुपट्टे घालून, दुचाकीत पेट्रोल भरून घराबाहेर पडत आहेत. राजकीय पक्षांच्या बूथमध्ये दिवसभर ठिय्या देतात. सायंकाळी सभा, बैठकांमध्ये उमेदवाराच्या मागेमागे दिसतात. रात्रीला खाना वळीमध्येही गर्दी दिसत आहेत.