Assembly Election : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विदर्भ प्रांत बैठक आटोपताच वंचित बहुजन आघाडीने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झालेला निर्णय पाहता वंचित बहुजन आघाडीने आता माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा द्यायचा असं एकमत केलं आहे. लवकरच या संदर्भातील अधिकृत घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून होणार आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे डॉ. अशोक ओळंबे यांना पाठिंबा द्यायचा नाही हे आधीपासूनच ठरले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. मिश्रा यांना पाठिंबा दिला आणि ते विजयी झाल्यास ते पुन्हा शिवसेनेसोबत जातील.
शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे मिश्रा यांना पाठिंबा देणे म्हणजे काँग्रेसलाच पाठिंबा देण्यासारखे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे मत होते. या सगळ्या घडामोडीत वंचित बहुजन आघाडीचे लक्ष देखील नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत बैठकीकडे होते. संघाची प्रांत बैठक आटोपल्यानंतर वंचित सोमवारी (11 नोव्हेंबर) निर्णयावर पोहोचली आहे. त्या अनुसार हरीश अलीमचंदानी यांनी बाजी मारली आहे. अलीमचंदानी यांच्यासोबत अन्याय झाल्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेरचा रस्ता धरला आहे. आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्यानंतरचा सक्षम व्यापारी चेहरा म्हणून वंचित त्यांच्याकडे पाहत आहे.
गावाचे नुकसान टळेल
अकोला जिल्ह्यामध्ये विशेषत: शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीला जातीय दंगली नको आहेत. त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच साजिद खान पठाण यांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. वंचित बहुजन आघाडीने या संदर्भात पत्रही काढले होते. डॉ. अशोक ओळंबे यांची प्रहार जनशक्ती पार्टी वेळ आल्यास महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत जाऊ शकते. त्यामुळे त्यांनाही पाठिंबा देऊ नये, असे मत वंचित बहुजन आघाडीचे होते. परिणामी हरीश अलीमचंदानी यांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते.
हरीश अलीमचंदानी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत, असे वृत्त अत्यंत जबाबदारीने ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. मात्र भाजपकडूनच हरीश अलीमचंदानी यांना ‘वंचित’चे दरवाजे बंद व्हावेत, असा प्रयत्न सुरू होता. या सर्व चढाओढीत काँग्रेसचे बंडखोर डॉ. झिशान हुसेन हे प्रकाश आंबेडकर यांच्या पायाजवळ जाऊन बसले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली. पण साजिद खान पठाण यांनी संपूर्ण ताकदीचा उपयोग करून डॉ. झिशान हुसेन यांच्यासह अनेक मुस्लिम उमेदवारांना माघार घ्यायला लावली. या धोक्यामुळे वंचित बहुजन आघाडी दुखावली. जाती- धर्माच्या राजकारणामुळे काहींनी संविधानालाही श्रेष्ठ मानले नाही, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी व्यक्त होत होती.
दोन्ही उमेदवार नको
वंचित बहुजन आघाडीच्या मते साजिद खान पठाण आणि विजय अग्रवाल हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या दोन्ही उमेदवारांचा विजय नको आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा पर्याय म्हणून हरीश अलीमचंदानी हे सक्षम असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे झालं आहे. प्रस्थापित उमेदवाराकडून व्यापाऱ्यांना जीएसटीची चोरी, मालमत्ता कराची वसुली, इन्कम टॅक्सची कारवाई, उत्पादन शुल्क विभागाचा त्रास अशा धमक्या दिल्या जाऊ शकतात. वंचित बहुजन आघाडीकडून अशा स्वरूपाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतरही वंचित बहुजन आघाडीचा ठरलं आहे. पाठिंबा हरीश अलीमचंदानी यांनाच द्यायचा. लवकरच त्याची अधिकृत घोषणा झालेली दिसेल.