Politics : पाच वर्षानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत काक, काकू, मावशी, आत्या, आजी, आजोबा, या नात्यांना मतांसाठी उजाळा मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाच वर्षांनंतर का होईना जुन्या नात्यांना चार्जिंग मिळू लागले आहे. शेतात जाणाऱ्या अथवा गावात काट्यावर बसलेल्या मंडळींना पाहून विविध नात्यांनी आवाज देण्याचे प्रमाणही वाढले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक रंगणार
बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत निवडणूक अतिशय रंगतदार तेव्हढीच चुरशीची होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांनी मते मिळवण्यासाठी विविध उपाययोजनांवर काम सुरू केले आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांची प्राचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तर, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघांतील नातेवाइकांची यादी तयार केली आहे. संबंधित नातेवाइकांचे मागील अनेक वर्षांचे संबंध, त्यावेळी त्यांच्या लग्नात आपण सहभागी झालो होतो. मुलाच्या वाढदिसाला, तसेच वडिलांच्या तेराव्याला आलो होतो. अशा मागील आठवणींना उजाळा दिला जात आहे.
25 ते 30 वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेची माहिती मतदार नातेवाइकांना नसली तरी संबंधित उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते त्याला उजाळा देत आहेत. काही चुकले असेल तर माफ करा परंतु यावेळी पक्षांने दिलेली संधी पुन्हा येणे शक्य नसल्याने थेट नातेवाईकांचे पाय धरणे व हात जोडणेसुद्धा उमेदवारांनी सुरू केले आहे. अशातही संबंधित नातेवाईक आपल्याला मत देत नसेल तर, प्रतिस्पर्धी उमेदवाराला मत न देता तिसऱ्यालाच मतदान करण्याचा सल्ला उमेदवार देत आहेत. एरवी मावशी, आत्याकडे, फारसे लक्ष न देणारे भाचे आता मावशीला व आत्याला आपल्याकडे लक्ष द्यायला सांगत आहेत.
कार्यकर्त्यांकडे विशेष लक्ष
प्रचारात प्रत्येक उमेदवाराला मतदाराशी आपुलकीची भाषा वापरावी लागते. किमान मतदान होईपर्यंत तरी एक चूकही महागात पडू शकते. यामुळे प्रत्येक गावात असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना व्यवस्थित पद्धतीने हाताळावे लागत आहे. एखाद्या दिवशी एखादा कार्यकर्ता आपल्याकडे आला, तर लगेच त्याच्या अपेक्षा जाणून घेऊन पूर्ततेसाठी प्रयत्नही केले जात आहेत. चहापान, जेवणावळी यात कुठलाही कसूर केला जात नाही. त्यामुळे दररोज सायंकाळी प्रचाराच्या कामाला चांगलाच वेग येत आहे.