Mahayuti : राज्यात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील 80 लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेच्या दोन हफ्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन टप्प्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 48 लाख महिलांच्या खात्यात स्वातंत्र्य दिनाचा सूर्य उगविण्यापूर्वीच म्हणजे पहाटे चार वाजता रक्कम जमा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचे तटकरे म्हणाल्या. 14 ऑगस्टपासूनच योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. सरकारकडून महिलांना दीड हजार रुपये दरमहा देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यत योजनेचा निधी जमा होणार आहे. त्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणवर अर्ज दाखल झाले आहेत.
कोट्यवधी लाभार्थी
आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार 1.62 कोटींपेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. अद्यापही अर्जांचा ओघ कायम आहे. राज्यातील एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, असे सरकारचे मंत्री सांगत आहे. त्यामुळे लाभार्थी संख्येत वाढ होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी हुकमाचा एक्का ठरणार आहे. परिणामी योजनेच्या प्रचार-प्रसाराचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रचार-प्रसारावर चांगलाच जोर देण्यात येणार आहे. सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी 47 हजार 436 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये योजनेची जाहिरात करण्यात येणार आहे. फोनवरून कॉलही करण्यात येतील. बस स्थानकांवर फलक लावण्यात येतील. मेट्रो आणि रेल्वे स्थानकावरही बोर्ड लावले जातील. याशिवाय राज्यभरातील अनेक महत्वाच्या ठिकाणीही जाहिरातबाजी करण्यात येणार आहे. प्रसिद्धीसाठी असलेल्या आराखड्यालाही महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे.