Buldhana constituency : सोमवारी निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आणि चिन्ह वाटपानंतर आता उमेदवार आपले चिन्ह घेऊन प्रचाराला लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशी बहुतांश उमेदवारांनी प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या जिल्हाभरात 6 प्रचार कार्यालयांचे उद्घाटन सकाळच्या मुहूर्तावर पार पडले. त्या पाठोपाठ काही अपक्षांनीं ही प्रचाराचा नारळ फोडला.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल सोमवारी 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यांनतर खऱ्या अर्थाने आज पासून प्रचाराचा धूम-धडाका सुरु झाला. यामध्ये महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव चौथ्यांदा विजयाची गुढी उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आज, 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खा.प्रतापराव जाधव यांची लोकसभा क्षेत्रातील 6 विधानसभा क्षेत्रात प्रचार कार्यालये असणार आहेत. त्या कार्यालयातून खा.जाधव यांच्या प्रचाराची रूपरेषा आखली जाणार आहे. सकाळी मेहकर येथील निवासस्थानी गुढी उभारून पूजन केल्यानंतर मेहकर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. सध्या खा.जाधव यांचे असलेले शिवसेना जनसंपर्क कार्यालय हेच निवडणूक कालावधीत प्रचार कार्यालय असणार आहे. सकाळी 9 वाजता देऊळगाव राजा येथील बस स्टँड चौक, सकाळी साडेदहा वाजता चिखली येथील सुपर गेस्ट हाऊस जवळ, साडेअकरा वाजता बुलडाणा शहरातील गांधी भवन येथे, दुपारी दीड वाजता शेगाव येथील अग्रसेन चौक तर त्यांनतर खामगाव येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ भारत वीज भांडार समोर, जळगाव जामोद विधानसभेतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसरीकडे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना पाना हे चिन्ह मिळाले आहे. तुपकरांच्या हाती आता पाना आला आहे, त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट कसणार, अशी आपसूक प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविकांत तुपकर समर्थक सिंदखेडराजात हजारोच्या संख्येने दाखल झाले होते.
Lok Sabha Election : बुलढाणा जिल्ह्यात जोडावे लागणार अतिरिक्त बॅलेट युनिट !
दुसरे चर्चेतील उमेदवार संदीप शेळके यांनी या आधीच प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. त्यांनी आज परिवर्तनाची गुढी उभारून जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसण्याचा संकल्प केला.
गुढीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याला विकासात्मक बाबतीत पुढे नेण्यासाठी तरुण-तरुणींना रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्याला एमआयडीसी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल. त्याचबरोबर इतर प्रकारचे धोरणात्मक फलक लावून गुढी उभारली आहे. या निवडणुकीत निकाल काहीही येवो मात्र, शेळकेंच्या लढाऊ वृत्तीची चर्चा मात्र जोरात आहे.