Political War : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. राज्यातील विविध विषयांना घेऊन अधिवेशन चांगलेच गाजत आहे. अधिवेशनाच्या नवव्या दिवशी पावसामुळे कामकाज चालू शकले नाही. मात्र आज दहाव्या दिवशी अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘भ्रष्टाचारी झाले चौकीदार असा महायुतीचा कारभार’ असे म्हणत महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अवघ्या काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात झाली ती विरोधकांच्या आक्रमक निदर्शनापासून, विरोधकांनी सुरुवातीला विधान भवनाच्या पायऱ्यावर येत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराच्या विरोधात विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘भ्रष्टाचारी झाले चौकीदार असा महायुतीचा कारभार, भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
‘भाजपा हटवा, भ्रष्टाचार मिटवा’ तसेच महायुती सरकारची ऑफर पक्षप्रवेश करा, क्लीन चिट मिळवा’, शूर आम्ही मिंधे, दादा आणि भाजपचे सरदार चिरडून गरिबांना होऊ पसार मदतीला आमच्या ‘मींध्यांचे सरकार’, सर्वसामान्यांच्या जीवाला नाही मोल, श्रीमंतांचा पैशांच्या जीवावर सुरू खेळ, भाजपाची वॉशिंग मशीन, आधी आरोप मग क्लीन चीट, भ्रष्टाचारी झाले चौकीदार, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात मजाविकास आघाडीने महायुती सरकारला घेरले आहे.
सभागृहात मंत्र्यांची दांडी
अधिवेशन सुरू झाल्यानंतर सभागृहात मंत्री उपस्थित राहत नसल्याने विरोधक पुन्हा आक्रमक झाले. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलताना, झाडणीमध्ये एका अधिकाऱ्याने 640 एकर जागा खरेदी केली. कमाल मर्यादेपेक्षा अधिक जमिनीची खरेदी केली गेली. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून या अधिकाऱ्याने जमिनी ताब्यात घेतल्या. मात्र ज्या विभागाची चर्चा आहे. ते मंत्रीच सभागृहात नाहीत तर चर्चेला काय अर्थ आहे असे म्हणत वडेट्टीवार आक्रमक झाले. तर भास्कर जाधव म्हणाले, विरोधी पक्षनेते बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बसले पाहिजे. ते नाही तर किमान दोन पैकी एक उपमुख्यमंत्री असले पाहिजे. मात्र संबंधित चर्चेच्या विभागाचे मंत्रीही नाहीत. हे सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन आहे. जयंत पाटील यांनी हे सभागृह स्थगित करून मंत्र्यांना बोलवा अशी मागणी केली.
Maratha Reservation : ‘फडणवीस साहेब, तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहात पण..’
भास्कर जाधव म्हणाले, 2014 पासून सभागृहात सचिव असायचे. मात्र आता मंत्रीही नसतात. सरकार अधिकाऱ्यांना इतके का लाडावून ठेवत आहे? असे म्हणत जाधव आक्रमक झाले. तर जयंत पाटील म्हणाले, शेवटचे अधिवेशन असल्याने मंत्र्यांनी उपस्थित राहावे. सभागृह स्थगित करून मंत्र्यांना बोलवावे.