Akola Constituency : अकोला लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात वंचित, भाजप आणि काँग्रेस अशी पुन्हा एकदा तिरंगी लढत होऊ घातली आहे. दरम्यान, गुढीपाडवा हा सण सर्वत्र साजरा केला जात असतानाच उमेदवारांकडून मात्र या सणाचे औचित्य साधत मतांची पेरणी करण्यात आली. काहींनी प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले.
अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस चे उमेदवार डॉ. अभय पाटील हे दोघेही महाआरती करताना दिसून आले. तर प्रकाश आंबेडकर यांनीही गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा देत मतदारांना आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अकोला मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तिरंगी लढत असलेल्या अकोल्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या या मतदारसंघावर आहे. प्रकाश आंबेडकर हे अकराव्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. तर भाजपकडून खासदार पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. प्रचाराला गुढीपाडव्या पासून वेग आलेला दिसला. संधीचं सोनं करीत आज सर्वच उमेदवारांकडून मतांची पेरणी होत असल्याचे पाहायला मिळाले. सर्वच उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचेही आज उदघाटन करण्यात आले होते. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतही उमेदवारांनी हजेरी लावत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
राजराजेश्वर मंदिरात दोन उमेदवार महाआरतीत सहभागी!
गुढीपाडवा आणि प्रचाराचा पहिला दिवस एकच आल्याने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेस व भाजप उमेदवार अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरामध्ये महाआरती करताना दिसून आले. भाजप महायुतीचे अनुप धोत्रे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील एकत्रित दिसून आले. अनुप धोत्रे यांच्या हातात आरती होती तर डॉ.अभय पाटील हे टाळ्या वाजवत होते.
आंबेडकरांनी गुढीपाडव्याच्या दिल्या शुभेच्छा
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मतदारांना आवाहन केले. अकोल्यात परिवर्तन घडवायचे आहे, यासाठी आपल्या सर्वांची साथ हवीय. जात-पात न पाहता आपण मतदान करावे व अकोल्यात विकासाची गुढी उभी करावी, असे ते म्हणाले. तीनही उमेदवारांकडून आवाहन करण्यात येत असले तरी या आव्हानाला आणि कोणत्या उमेदवाराला मतदार किती प्रतिसाद देतात ते निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.